चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू; नातेवाईकांनी ठेवला सांगोल्यात रुग्णालयाबाहेर मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:56 PM2020-12-25T20:56:04+5:302020-12-25T21:12:31+5:30
तहसील व पोलीस प्रशासनाची मध्यस्थी; अखेर त्या महिलेवर रात्री उशिरा झाले अंत्यसंस्कार
सांगोला - हातीद (ता. सांगोला) येथील प्रसूतीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केलेल्या 21 वर्षीय महिलेवर तेथील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे सोलापूर येथील खासगी रूग्णालयात मुत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तिचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयासमोर आणून ठेवला.
याप्रकरणी चुकीच्या उपचार करणाऱ्या सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या डाॅक्टरांसह संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास मृतदेहासह सांगोला ग्रामीण रुग्णालय समोर ठेवून ठिय्या मारला. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही असा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले .दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजीत सावर्डे पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गवळी सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगार यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन नातेवाइकांकडून घडल्या प्रकारची माहिती जाणून घेतली मात्र नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गुन्हा दाखल न झाल्यास या ठिकाणीच मृतदेहावर अंत्यविधी केला जाईल असा टाहो फोडून गोधंळ घालण्यास सुरूवात केली.
अखेर पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा शब्द दिल्याने नातेवाईक तिचा मृत देह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेल्याने उपस्थित प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
हातीद ता. सांगोला येथील सुधीर पांडुरंग भगत यांची पत्नी सुरेखा सुधीर भगत , वय- 21 हिस सासरे पांडुरंग भगत वडील महादेव भोसले ,आई वंदना भोसले यांनी 23 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्रसूतीसाठी तिला असह्य वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली असता डाॅक्टरानी डॉक्टर मी आहे का ? तुम्ही अशी उध्दट भाषा वापरली.यावेळी डॉक्टरांनी एवढ्यावरच न थांबता नॉर्मल प्रसुतीसाठी तिचे पोट दाबून दाबून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे महिलेचे बाळ पोटातच दगावले .सदरचा प्रकार संबंधित डाॅक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाइकांना बाळ बाळातिणीला तात्काळ पुढील उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे सासरे पांडूरंग भगत यांनी सांगितले . दरम्यान सांगोल्यात खाजगी रुग्णालयात उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचाराकरिता सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.प्रसूतीदरम्यान तिला अतिरक्तस्त्राव सुरूच होता तेथील डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिची गर्भाशयाची पिशवी काढल्याने गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला .या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी सोलापुरातून थेट तिचा मृतदेह शुक्रवारी रात्री 7 च्या सुमारास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय समोर आणून ठेवून संबंधित डाॅक्टरसह महिला कर्मचारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी सासरे पाडूरंग दत्तू भगत यांनी केली.