होटगी मठाचे योगीराजेंद्र शिवाचार्य यांचे निधन, होटगी मठाच्या शाळा, महाविद्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:42 PM2017-12-21T12:42:36+5:302017-12-21T12:44:39+5:30
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे तपोरत्नं, श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते ९० वर्षांचे होते.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो वीरशैव भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि होटगी मठाचे तपोरत्नं, श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठात लिंगैक्य झाले. ते ९० वर्षांचे होते.
होटगी मठाचे पूज्य चन्नवीर शिवाचार्य लिंगैक्य झाल्यावर उत्तराधिकारी म्हणून तपोेरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा होटगी मठाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक सोहळा पार पडला होता. सोलापूर येथील बाळीवेस मठात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांच्या उपस्थितीत शिवलिंग पूजेचा सोहळा पार पडायचा. श्रावण महिन्यात होटगी मठात त्यांच्या तपोनुष्ठान सोहळ्यालाही भाविकांची मोठी उपस्थिती असायची. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी आणि बाळीवेस येथील होटगी मठानंतर तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी बृहन्मठ उभारला. दाक्षिणात्य पद्धतीचे महाद्वार उभे करून त्यांनी एक वेगळी वास्तुरचना उभी करून सोलापूरच्या वैभवात भर घातली. याच मठात धर्मसंस्कार वृद्धीसाठी रुद्रपठण, होमहवन, पूजाविधी, सुसंस्कार वर्ग घेऊन हजारो बटूंना घडवले.
धर्मसंस्कारासाठी होटगीपासून हिमाचल प्रदेश, शिखर शिंगणापूर, नवी दिल्ली येथे तपोनुष्ठान केले. श्रावणातल्या मधल्या सोमवारी पालखी महोत्सव काढण्यासाठी राज्यभर पदभ्रमंती योगीराजेंद्र शिवाचार्य यांनी केली होती. जगद्गुरूंच्या पंचपीठामध्ये होटगी महास्वामीजींचा सन्माननीय वावर होता. देशात ठिकठिकाणी त्यांचे अनेक मठ आहेत. जिल्ह्यात शैक्षणिक संस्था सुरू करून त्यांनी तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली.
दरवर्षी ५ फेब्रुवारी रोजी निघणाºया लिंगैक्य पूज्य चन्नवीर शिवाचार्य यांच्या आत्मलिंग ज्योत यात्रेत योगीराजेंद्र शिवाचार्य यांचा बाळीवेस येथील मठापासून ते होटगी येथील मठापर्यंत पायी सहभाग असायचा. भाविक श्रीमंत असो की गरीब, याकडे न पाहता प्रत्येक भाविकाकडे पाहण्याचा, बोलण्याचा त्यांचा खास पिंड होता. अलीकडे शरीराने थकले असले तरी मनाने ते कधीच थकले नाहीत. आजपर्यंत अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठ, बाळीवेस आणि होटगी येथील मठात जाऊन भाविकांना दर्शन देण्याची त्यांची पद्धत होती. आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांनी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची नियुक्ती केली होती.
योगीराजेंद्र शिवाचार्य लिंगैक्य झाल्याची वार्ता कळताच भाविकांवर, तिन्ही मठांवर आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर शोककळा पसरली. बुधवारी रात्रीपासूनच भाविकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उद्या (गुरुवारी) आणि शुक्रवारी होटगी मठाच्या शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
--------------------
शुक्रवारी अंत्यसंस्कार
- उद्या (गुरुवारी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री बाळीवेस येथील होटगी मठातही भाविकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. शुक्रवारी जगद्गुरूंच्या सान्निध्यात अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी मठाच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधींसह अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.