कर्जमाफीची प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण होणार, सुभाष देशमुख यांची माहिती
By Admin | Published: July 15, 2017 11:02 AM2017-07-15T11:02:53+5:302017-07-15T11:02:53+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : अन्य राज्यांमध्ये कर्जमाफी अगोदर झाली असली तरी दि.२८ जून २0१७ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन तुलनेत आम्ही खूप पुढे आहोत. चुकीच्या अपात्र लोकांची कर्जमाफी होऊ नये हा यामागचा उद्देश असून येत्या तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. खऱ्या कर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन करीत जिल्ह्यातील दोन बँका सोडल्या तर कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांचे अर्ज व ठराव शासनाकडे पाठवला नसल्याची खंत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
मंत्रीपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापप्रसंगी सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस उमेश कदम, भाजपचे दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी आदी उपस्थित होते. दि.५ जुलै २0१७ रोजी राज्य बँकेने परिपत्रक काढले असून कर्जमाफीसाठीचा अर्ज आणि ठराव द्यावा अशा सूचना देऊनही संबंधित बँकांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त करीत सुभाष देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नावावर काही ठिकाणी संचालकांनी कर्ज घेतले आहे. शेतकऱ्यांना याची कसलीच माहिती नाही, अशी फसवेगिरी रोखण्यासाठी बँक आणि तहसील कार्यालयाकडून माहिती मागविली जात आहे. सखोल चौकशीनंतर येत्या तीन महिन्यात जाहीर केलेली कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल.
सहकारमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेले स्वातंत्र्य आणि सहकार्यामुळे योग्य निर्णय घेण्यास वाव मिळाला आहे. सहकार क्षेत्राचा अनुभव पाठीशी असल्याने चांगले काम करता आले, शेतकऱ्यांच्या ज्या शंका होत्या त्यावर पर्याय काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना मुबलक पाणी, बियाणे, खते, साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून विकास सोसायट्यांना पतपुरवठा करण्यास सांगितले आहे. एका गावात एक विकास सोसायटी होती आता अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत हे धोरण घेतले आहे. गावात स्पर्धा निर्माण झाली की विकास होतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बदल केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्वत:चा भाव करता यावा म्हणून दि.१४ आॅगस्ट २0१६ रोजी महाराष्ट्रात संत शिरोमणी आठवडा बाजाराची सुरुवात केली.
राज्यात आज ९६ ठिकाणी हे बाजार सुरू झाले असून भविष्यात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. चुकीचे काम करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाणार आहे. अपात्र संचालकांना पुढील १0 वर्षांत निवडणुकीला उभे राहता येऊ नये असा नियम केला आहे. पूर्वी चौकशीसाठी उपनिबंधकाला दोन वर्षांची मुदत होती. आता संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत निर्णय न देण्याचा नियम केला आहे.
महाराष्ट्रात ३ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले असून २ लाख ३0 हजार क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे. राहिलेली तूरसुद्धा ७/१२ पाहून खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही यावेळी सुभाष देशमुख यांनी सांगितले.
---------------------
सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केलेले मुद्दे
- बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात नियमावली होत असून, त्यानुसार निवडणुका होतील.
- पिकांची नोंद करण्यासाठी नवीन अॅप आणणार असून, त्यावर शेतकऱ्यांना पिकाची नोंद करता येणार आहे.
- गारमेंट उद्योगात मोठा रोजगार आहे, नरसिंग मेंगजी मिलच्या जागेत गारमेंट उभारण्यात येत असून दोन महिन्यात कामाला सुरुवात होईल.
- राज्यात २ लाख ३0 हजार बँका आहेत, २२ हजार विकास सोसायट्या आहेत. ११ हजार सोसायट्या अडचणीत आहेत. अडचणीतील सोसायट्यांतील लोकांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
- नोटाबंदीच्या काळात उस्मानाबाद येथे सापडलेले पैसे हे हेड आॅफिसचे होते, त्याबाबत सीआयडीने चौकशी केली असून मी दोषी असतो तर गुन्हा दाखल झाला असता.
- रोहन देशमुखच्या नावे जुनी मिलच्या जागेचा झालेला व्यवहार हा २0१0 सालचा असून यात कोणताही गैरप्रकार नाही.
- जिल्हा मध्यवर्ती बँकांना माझे आवाहन आहे की त्यांनी विकास सोसायट्यांचा लाभांश दिला तरी त्या सुरळीतपणे चालतील.
- तुरीच्या उत्पादनानंतर आता कापसाचे उत्पादन मोठे आहे, शासकीय गोडावून वाढवण्याचा प्रयत्न आहे.
- कांदा उत्पादनावर अनुदान देण्याचा प्रयत्न असून १00 रुपये भाव दिला आहे.