मोहोळ मतदारसंघातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 05:10 PM2019-10-10T17:10:35+5:302019-10-10T17:12:42+5:30
सरपंच आले एकत्र; खराब रस्त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेल्याची भावना
सुस्ते : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकºयांचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
तिºहेमार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे १५ किमी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. या रस्त्याच्या प्रश्नावरून मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, विटे व पोहोरगाव या चार गावांनी विधानसभामतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थी माध्यमिक व महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जावे लागते; मात्र हा रस्ता खराब असल्याने वेळेत एसटी येत नाही. घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अचानक एखाद्या रुग्णास पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते; मात्र रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होत नाहीत. अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच जीव गमवावा लागतो.
गेल्या वीस वर्षांपासून या चार गावच्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता नूतनीकरणासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीने ठराव देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच यापूर्वी अनेक नेतेमंडळींकडे रस्त्याची मागणी केली असता, नेत्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्याने या रस्त्याचे नूतनीकरण झाले नाही. रस्त्यावरून जात असताना अनेकांना कमरेचे, मणक्याचे आजार झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. या गावच्या सरपंचांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी गावचे सरपंच संगीता कांबळे, विट्याचे सरपंच सिंधुबाई दांडगे, पोहोरगावचे सरपंच लता काळे, तारापूरचे सरपंच समाधान शिंदे , मोहन दांडगे, सौदागर गायकवाड, रेवणसिद्ध पुजारी, विठ्ठल पाटील, बालाजी वाघ, दिगंबर कांबळे, छगन पवार, राजूबापू पाटील, प्रताप पवार, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सपाटे, वैभव डोळे, लाखात मुलाणी, अल्ताफ मुलाणी, सिद्धेश्वर गायकवाड, संजय परकाळे, दिलीप पवार, शरद पवार, आनंदा पवार, अमर पवार, बंडू पवार, सागर पवार, दादा सलगर, हनुमंत पाटील, श्रीकांत डोळे, सिद्धाराम वाघमोडे, गणेश शिंदे, लक्ष्मण डोंगरे, अरुण परे, बाबासाहेब गवळी आदी उपस्थित होते.
चार गावात ७९०० मतदार
- तारापूर २ हजार ५००, खरसोळी १ हजार ९००, विटे १ हजार १०० व पोहोरगाव २ हजार ४०० असे एकूण चार गावचे मतदान ७ हजार ९०० इतके मतदान आहे.
आम्ही गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. तरी शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. तसेच गेल्या आठवड्यात या रस्त्यावरून विद्यार्थी घेऊन जाणारी शाळेची बस घसरली होती. त्या अनुषंगाने आम्ही या चार गावचे लोक एकत्र येऊन रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
- दिगंबर कांबळे, खरसोळी
नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तो रस्ता व्हावा यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.
- समाधान शिंदे, सरपंच, तारापूर