यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील ७०२ गावांनी घेतला हा निर्णय
By appasaheb.patil | Published: August 26, 2020 11:53 AM2020-08-26T11:53:34+5:302020-08-26T11:57:49+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
सुजल पाटील
सोलापूर : कोरोनामुळे यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील ७०२ गावांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरम्यान, यंदा जिल्ह्यात फक्त ६८८ सार्वजनिक तर २२९ गावात ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, गणेशोत्सव व मोहरम उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना जिल्हा व ग्रामीण पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या़ जिल्ह्यातील विविध भागात ग्रामीण पोलिसांनी शांतता कमिटीच्या बैठका घेऊन गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते़ शिवाय कोरोनामुळे गावात यावर्षी गणेशोत्सव साजरा करू नका, गावातील प्रत्येकाची काळजी घ्या, संसर्ग टाळा, सामाजिक कार्यक्रमांवर भर देण्याचे साकडे घातले होते़ या पोलिसांच्या हाकेला साथ देत जिल्ह्यातील ७०२ गणेश मंडळांनी यंदा आपल्या गावात गणपतीची प्रतिष्ठापना केली नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
असा आहे गणेशोत्सव, मोहरमचा बंदोबस्त
सोलापूर जिल्ह्यात साजरा होणाºया गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक ०१, अपर पोलीस अधीक्षक ०१, उपविभागीय पोलीस अधिकारी ०७, वरिष्ठ पोलीस निरीक्षक २६, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ९३, पोलीस कर्मचारी १८५०, आरसीपी पथक ०४, क्यूआरटी पथक ०२, स्ट्रेकिंग ०९, एसआरपीएफ ०२, होमगार्ड ७०० असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
गणपती न बसविलेल्या मंडळांची पोलीस ठाणेनिहाय संख्या
सोलापूर तालुका - २२, मोहोळ - ५०, मंद्रुप - ३८, कामती - १२, अक्कलकोट उत्तर - १६, अक्कलकोट दक्षिण - २५, वळसंग - ०८, वैराग - ३४, माढा - ३३, पांगरी - २६, करमाळा - ९१, करमाळा - २६, करमाळा - ९१, टेंभुर्णी - १०, कुर्डूवाडी - ११, पंढरपूर तालुका - ५२, करकंब - १९, मंगळवेढा - ८०, सांगोला - १०३, माळशिरस - ०५,
मोहरम उत्सवाबाबत...
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत मागील वर्षी ९८७ ठिकाणी पंजे, २९८ ठिकाणी डोले, २५३ ठिकाणी सवारी तर २५३ ठिकाणी ताबूत बसविण्यात आले होते़ यंदा कोरोनामुळे जिल्ह्यात फक्त २१५ ठिकाणी पंजे, ५९ ठिकाणी डोले, १०९ ठिकाणी सवारी तर २४ ठिकाणी ताबूत बसविण्यात आले आहेत़
शासनाने कोविड १९ च्या परिस्थितीत गणेशोत्सव व मोहरम मर्यादित स्वरुपात साजरा करावा, उत्सव काळात कोठेही गर्दी करू नये, उत्सव कालावधीत धार्मिक पूजाअर्चा करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादाचे पालन करावे़ याशिवाय गणेशोत्सव व मोहरम उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे़
- अतुल झेंडे,
अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस दल