सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ; ६८ लिंगांना तैलाभिषेकाच्या धार्मिक विधीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 02:28 PM2021-01-12T14:28:16+5:302021-01-12T14:32:20+5:30
यात्रेतील बदलते स्वरूप : पालखी धरणाऱ्यांना पहिल्यांदाच विश्रांती
सोलापूर : इतिहासातील यात्रेच्या नऊ-साडेनऊशे वर्षांच्या परंपरेला कोरोनामुळे पहिल्यांदाच छेद मिळाला असून, ट्रॅक्टरच्या मदतीने नव्याने तयार करण्यात आलेली पालखी तैलाभिषेकाच्या सोहळ्यात दिसत होती. योगसमाधीसारखी आकर्षक फुलांची मेघडंबरीसह सजावट करण्यात आली असून, पालखी सोहळ्यातील २४ सेवेकऱ्यांना यंदा विश्रांती मिळाली आहे.
मनपा आयुक्तांनी यात्रेचा आदेश काढताना अनेक बंधने आणली आहेत. स्वतंत्र वाहनातून हिरेहब्बू मंडळी आज ६८ लिंगांना तैलाभिषेक करीत प्रदक्षिणा घालीत आहेत. वाहनाच्या अग्रभागी ट्रॅक्टरला जोडलेली पालखी आहे. पालखी सोहळ्यात चवरा, चांदीची छडी, अब्दागिरी, गोल छत्रीसह पालखीला खांदा देणारे सेवेकरी दिसून येत नाहीत. या सेवेकऱ्यांच्या भूमिकेत यंदा ट्रॅक्टर दिसत आहे.