वाळू लिलावाअभावी गौण खनिजच्या महसूलात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:07 PM2019-05-06T15:07:57+5:302019-05-06T15:09:54+5:30
सोलापूर जिल्ह्याला ११८ कोटींचे होते उद्दिष्ट; मात्र प्रत्यक्षात ८५ कोटीच मिळाला महसूल
सोलापूर : मागील दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलावच होत नसल्याने गौण खनिज विभागाचा महसूल उद्दिष्टापेक्षा ३३ कोटींनी कमी झाला आहे. सन २0१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता गौण खनिज विभागास शासनाने ११८ कोटी महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मार्च २0१९ पर्यंत केवळ ८५ कोटी रुपयांचाच महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाकडे जमा झाला आहे.
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयास ७ कोटींचे उद्दिष्ट होते. या तालुक्यात ७ कोटी ५६ लाखांचा महसूल जमा झाला आहे.१0८ टक्के वसुली या तालुक्यात झाली आहे. बार्शी तहसील कार्यालयास ६ कोटीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यापैकी ३ कोटी १२ लाखांचा महसूल जमा झाला आहे. केवळ ५२ टक्केच वसुली या तालुक्यातून झाली आहे.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयास १५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त १७ कोटी रुपये म्हणजे ११३ टक्के महसूल जमा झाला आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयास १८ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने फक्त ६ कोटी ७६ लाख म्हणजे ३७ टक्केच महसूल वसूल केला आहे.
माढा तहसील कार्यालयास ७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने ३ कोटी ५१ लाख म्हणजे ५0 टक्के महसूल वसूल करण्यात वर्षभरात यश मिळविले आहे. करमाळा तहसील कार्यालयास ७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी या तालुक्याने १ कोटी ३६ लाख म्हणजे १९ टक्केच उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
पंढरपूर तहसील कार्यालयास १७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ५ कोटी ९२ लाखांचा महसूल जमा झाला आहे. वर्षभरात ३४ टक्केच वसुली या तालुक्यातील झाली आहे. मोहोळ तहसील कार्यालयास ९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३ कोटी ७३ लाख म्हणजे ४१ टक्के महसूल जमा झाला आहे.
मंगळवेढा तहसील कार्यालयास १४ कोटींचे महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८ कोटी १८ लाखांचा म्हणजे ५८ टक्केच महसूल जमा झाला आहे. माळशिरस तहसील कार्यालयास ९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८ कोटी ९२ लाख म्हणजे ९९ टक्के महसूल जमा झाला आहे.
मुरूम आणि दगड टॉपवर !
भीमा नदीत होणाºया वाळू लिलावामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागास यापूर्वी सर्वाधिक महसूल मिळत होता. मात्र अलीकडच्या काही काळात वाळू लिलावात अनेक अडथळे येत असल्याने या माध्यमातून मिळणारा महसूल अत्यंत कमी झाला आहे. दगडखाणी व मुरुम आदीच्या माध्यमातून गौण खनिजला मिळणारा महसूलच सर्वाधिक ठरत आहे.