रुग्णसंख्या कमी करा, त्यानंतर सोलापुरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 04:28 PM2022-01-27T16:28:11+5:302022-01-27T16:28:23+5:30
पालकमंत्र्यांची सूचना : नियोजन भवनात झाली कोरोना आढावा बैठक
सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी दक्षतेने नियोजन करा. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्या, अशी सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे.
मंगळवादी दुपारी नियोजन भवनात पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, मनपा उपायुक्त धनराज पांडे आदी उपस्थित होते.
पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा, माढा या पाच तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. तसेच लसीकरणात सोलापूर मागे आहे. सोलापूरला मुबलक लसी उपलब्ध होत आहेत. २ लाख २६ हजार ४१२ किशोरवयीन मुलांपैकी केवळ ६९ हजार ६७३ जणांना डोस देण्यात आला आहे. पहिला डोस २९ लाख ८६ हजार ६६५ नागरिकांना दिला असून ८५.४ टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस १८ लाख ९४ हजार ५५३ नागरिकांनी घेतला असून याची टक्केवारी ५५.५ टक्के झाली आहे, अशी माहिती या वेळी पालकमंत्र्यांनी दिली आहे.
आयसीयू बेडची निर्मिती
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ३२ बालकांसाठी आणि ४० इतरांसाठी, अक्कलकोट येथे २० बेड आणि सिव्हील हॉस्पिटलमध्ये ४२ आयसीयू बेड नव्याने तयार केले आहेत.