विधानसभेला वंचितला आघाडीसोबत घेणार : दिपक साळुंखे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 02:21 PM2019-05-25T14:21:44+5:302019-05-25T14:26:17+5:30
मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशाने फरक पडणार नाही; मात्र पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू - राष्ट्रवादी
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीमुळे माढ्यातही राष्ट्रवादीचा तोटा झाला आहे. सोलापुरातही मोठा फरक दिसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला सोबत घेण्यात यायला हवे, असा अहवाल आम्ही प्रदेश कार्यकारिणीला पाठविणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी दिली़ लोकसभेला ‘वंचित’सोबत आघाडी झाली असती, पण त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे झाली नाही, असेही साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रशांत जाधव, मिलिंद मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना साळुंखे-पाटील म्हणाले की, माळशिरसमधून भाजपला लाखाचे मताधिक्य मिळाल्याचे सांगितले जाते. त्यात भाजपच्या जुन्या लोकांचाही वाटा आहे. मोहिते-पाटील भाजपमध्ये गेले म्हणून त्यातील काही मंडळी आमच्याकडे आली नाहीत. कुणाच्या येण्या-जाण्यानं निवडणूक निकालावर फारसा परिणाम होत नाही़ माढ्याच्या निकालावर राष्ट्रवादी आत्मचिंतन करेल, असेही साळुंखे यांनी सांगितले.
माढ्यातील पराभवाची कारणं निश्चितच तपासली जातील. ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची होती. विधानसभेची निवडणूक ही राज्यातील प्रश्नांवर होईल. त्यामुळे या निकालाचा विधानसभेच्या निकालावर फारसा परिणाम दिसणार नाही. मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा तोटा झाला, असे म्हणता येणार नाही. मोहिते-पाटलांना भाजपमध्ये ढकलले गेले की ते स्वत:हून गेले हा भाग जिल्ह्याला आणि राज्याला माहीत आहे. तो उच्च पातळीवरचा निर्णय आहे, पण निवडणुकीतील यश हे कुणाच्या येण्यानं आणि जाण्यानं मिळत नसते. नाना पटोलेंचे उदाहरण यात महत्त्वाचे आहे.