मृग नक्षत्राने ग्रामीण भागाची केली घोर निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:03+5:302021-06-09T04:28:03+5:30
चालू वर्षी सांगोला शहर व तालुक्यात कडक उन्हाळ्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात बदल झाला. मृग नक्षत्रापूर्वीच मान्सूनपूर्व ...
चालू वर्षी सांगोला शहर व तालुक्यात कडक उन्हाळ्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात बदल झाला. मृग नक्षत्रापूर्वीच मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला. यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० नंतर वातावरणात बदल झाला अन् ३.४५च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास सांगोला शहरात पाऊस झाला. मात्र तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिला पाऊस कुठेही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.
हवामान खात्याने १३, १४, १५ व १९ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मृग नक्षत्राच्या पावसानंतर शेतकरी खरीप बाजरी, मका पेरणीला सुरुवात करतो. यंदा मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरणीसाठी जमिनीत ओलावा झाल्याचे शेतकरी सांगत असले तरी मृग नक्षत्राच्या पावसानंतरच शेतकरी खरीप पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरणार असल्याचे दिसून येत आहे.
३१,५०४ हेक्टरवर होणार पेरणी
चालू वर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र वाढल्यामुळे ३१ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, मटकी आदी पिकांच्या पेरण्या होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभागाने कृषी केंद्रातून रासायनिक खते, विविध कंपन्यांची बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध केली आहेत. सध्या शेतकरी कृषी केंद्रात मका, बाजरी बियाणे खरेदीसाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोट ::::::::::::::::::
खरीप हंगाम २०२१मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी बाजरी प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत अनुदान तत्त्वावर २९.२३ क्विंटल एवढे बियाणे खरेदी-विक्री संघ सांगोला यांच्याकडे उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑफलाइन अर्ज कृषी साहाय्यकाकडे देऊन बियाणे परवाना घ्यावा.
- दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी