Solapur | सोलापुरात शनिवारी हरणं मेली, रविवारी दिसला रानगवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 02:57 PM2023-01-29T14:57:01+5:302023-01-29T14:57:29+5:30
वन विभागाकडून दुजोरा, वावर शोधण्यासाठी पथकांकडून पेट्रोलिंग
विलास जळकोटकर, सोलापूर: सोलापुरातील देशमुख-पाटील वस्ती परिसरातील सोलापूर-विजापूर पुलावरून शनिवारी तब्बल १५ हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बलदंड शरीराचा रानगवा आढळून आला. कुत्र्यांच्या पाठलागापासून तो सैरावरा पळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वन विभागाने भेट देऊन तो रानगवा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्याचा वावर कुठे आहे हे शोधण्यासाठी वन विभागाकडून पेट्रोलिंग सुरू असल्याचे उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
केगावजवळील देशमुख-पाटील वस्ती परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास म्हशीसारखा दिसणारा बलदंड शरीराचा रानगवा दिसल्याने कुत्र्यांनी या विचित्र प्राण्याचा पाठलाग सुरू केला. या आरडाओरड्याने वस्ती परिसरातील दत्ता गवळी आणि आबा घोरपडे यांनी पाहिले. त्यांनी लागलीच वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनच्या सदस्यांना खबर दिली. लागलीच टीमचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांनी धाव घेतली. याबद्दल वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना खबर दिली. वन विभागाचे पथकही तेथे हजर झाले. पथकाच्या निरीक्षणानंतर तो रानगवा असल्याचे सांगण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील नागिरकांना पथकाकडून सावध राहून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वन विभागाकडून खबरदारीच्या सूचना पाण्याचा फवारा मारणे, तसेच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची भूमिका असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं. गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे त्याला वास तीव्रतेने कळतो. गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. मात्र, नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे वन विभागाच्या पथकांकडून सांगण्यात आले.
पश्चिम घाटात आढळतात रानगवे
पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण ७०० ते १००० किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो. रानगवा प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळून जातात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वन विभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतो. पश्चिम घाटात रानगवे आढळतात .