‘सिद्धेश्वर’च्या चिमणी पाडकामाची स्थगिती फेटाळली
By Admin | Published: July 8, 2017 12:40 PM2017-07-08T12:40:09+5:302017-07-08T12:40:09+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याचा अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी फेटाळून लावला.
याप्रकरणी कारखान्याचे भागधारक महादेव चाकोते यांनी कारखान्यातर्फे नव्याने बांधण्यात आलेली चिमणी पाडू नये व याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचा दिलेला आदेश रद्द व्हावा म्हणून दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने चिमणी पाडकामाला एकतर्फी तात्पुरती स्थगिती दिली होती. यावर न्यायालयात सुनावणी झाली. मनपातर्फे अॅड. नंदकुमार पाटील यांनी बाजू मांडताना शहर हद्दीतील सर्व नवीन बांधकामांना मनपाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून बेकायदेशीर झालेले बांधकाम पाडण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. कारखान्याने चिमणी बांधताना मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम पाडणे न्यायाच्या दृष्टीने योग्य होईल, असे मत मांडले. विमान प्राधिकरणातर्फे अॅड. सार्थक चिवरी यांनी विमानतळ क्षेत्रात असताना कारखान्याने कोणतीही परवानगी घेतली नाही. १७ फेब्रुवारी व १७ मे रोजी कारखान्याने केवळ वाढीव बांधकामाची माहिती प्राप्त केली आहे. प्रस्तावित चिमणी विमानसेवेला अडथळा ठरणारी आहे, यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयास सादर केली. तसेच यापूर्वी कारखान्याने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण त्यात पाडकामाबाबत स्थगितीचे आदेश नाहीत. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली चिमणी पाडणेच योग्य असल्याचे निदर्शनाला आणले. सरकारतर्फे अॅड. वामनराव कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर बांधकाम पाडकामाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. या अधिकारान्वये त्यांनी चिमणी पाडण्याची कारखान्याला रीतसर नोटीस दिलेली आहे. सोलापूर हे केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेत समाविष्ट असून, सप्टेंबर २०१७ पासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी शासनाने मोठा खर्च केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित कारखान्याला कळविले आहे. पण कारखान्याने चिमणी हलविण्याची दखल घेतली नाही.