हार, फुलांऐवजी बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी घेऊन या ‘वही-पेन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:21 PM2019-04-11T12:21:36+5:302019-04-11T12:23:43+5:30
गती शिक्षणाला : सत्यशोधक परिवाराचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते भेट
सोलापूर :
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,
जो कोणी प्राशन करील,
तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
असा कानमंत्र दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी अभिवादनाला येणाºया भीमसैनिकांकडून एक वही व पेन देण्याचे आवाहन सत्यशोधक परिवाराच्या वतीने केले जाते. अभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते. लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. पुष्पहार, फुले, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून अभिवादन करतात.
अभिवादनानंतर दुसºया दिवशी या सर्व साहित्याचे रूपांतर निर्माल्या (कचरा) मध्ये होते. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भावना होती. आजही समाजात असे कुटुंब आहेत की जे केवळ शाळेला जाण्यासाठी वही व पेन नसल्याने काही वर्षातच शाळा सोडून देतात.
शाळा शिकवण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च पालकांना उचलता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना किमान वही व पेन देऊन शिक्षणासाठी मदत करावी या उद्देशाने सत्यशोधक परिवाराच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे. १४ एप्रिल २0१४ रोजी पहिल्यांदा हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरू केला. प्रतिवर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. लोक वही व पेन आणून देतात, त्याचे संकलन केले जाते. जून महिन्यात जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा महापालिकेच्या शाळा व अन्य खासगी शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले जाते. शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाते तेव्हा ते मनापासून खूप आनंदी होतात.
आजतागायत ४0 शाळांमधून २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. बहुतांश शाळा संस्थेच्या या उपक्रमाची वाट बघतात.
फोन करून विचारणा करतात, गरजू विद्यार्थ्यांची संख्या सांगतात. यंदाही हा उपक्रम राबवला जाणार आहे़ एक वही आणि पेन घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे.
शिक्षणाला आधार हीच खरी आंबेडकर जयंती : विक्रम गायकवाड
- बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, ते मोठ्या पदांवर जावेत, स्वत:बरोबरच कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धार करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला आहे. आजही बहुतांश कुटुंबातील पालक हे सकाळी उठून कामाला गेल्याशिवाय रात्री एकवेळचे पोटभर जेवण करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. केवळ पैसा नसल्याने शिक्षणाची इच्छा असतानाही अनेक विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात. त्यांना कुठेतरी छोटीशी मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १४ एप्रिल रोजी अभिवादनासाठी केवळ एक वही आणि पेन घेऊन येण्याचे आवाहन केले जाते. या उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे आणि हिच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे असे मला वाटते, अशी माहिती सत्यशोधक परिवाराचे विक्रम गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.