आरोपींना फायदा होण्यासाठी उणिवा ठेवल्या; सोलापुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 12:10 PM2021-11-26T12:10:58+5:302021-11-26T12:11:04+5:30
पोलीस आयुक्तांचा आणखी एक दणका : अन्य गोष्टींचा ठेवला ठपका, शहर पोलिसात खळबळ
सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश डान्सबारवर टाकलेल्या धाडीत पंचनामा करताना २० ते २५ आरोपींना फायदा व्हावा यासाठी उणिवा ठेवल्या. चौकशीनंतर कोणालाही न सांगता सिक रजेवर गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ (नेमणूक डीबी पथकप्रमुख विजापूर नाका पोलीस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री नागेश डान्सबारवर धाड टाकली होती. डान्सबारमधील गर्दी पाहून शीतलकुमार कोल्हाळ व इतर कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले होते. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सहायक पोलीस आयुक्त यांनी कोल्हाळ यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. घटनास्थळी जप्ती पंचनामा केला, मात्र त्यामध्ये २० ते २५ आरोपींना फायदा व्हावा, या उद्देशाने जाणीवपूर्वक उणिवा ठेवल्याचे निष्पन्न झाले.
पंचनाम्याबाबत विचारणा केली असता कोल्हाळ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा विचारणा केली असता काही एक उत्तर न देता कोणाला काहीही न सांगता सिक रजेवर गेले. कोल्हाळ यांच्याकडे यापूर्वी एकूण १८ गुन्हे प्रलंबित आहेत. त्यापैकी भादंवि कलम ४२० (फसवणूक) चे सहा गुन्हे, ३९२ (जबरी चोरी) चे चार गुन्हे, भादवि ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५४ (विनयभंग) व ३६३ (अपहरण) चे प्रत्येकी एक प्रमाणे गुन्हे प्रलंबित आहेत. प्रलंबित गुन्हे कोणाकडेही तपासासाठी हस्तांतरित न करता स्वत:च्या ताब्यात ठेवले. हे गंभीर गुन्हे मुदतीत निर्गती होणे आवश्यक असते. या कसुरीमुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे.