सिव्हील, अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 01:24 PM2020-04-21T13:24:47+5:302020-04-21T13:26:30+5:30
तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय मनुष्यबळ आणि आॅक्सिजन पुरविणारी यंत्रणा सज्ज
सोलापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलापूर शहराकरिता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध १८ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र (सिव्हील हॉस्पिटल) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटल यांच्या इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. कोव्हीड केअर सेंटर म्हणून नऊ आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.
कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या - पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव (४९०), वाडिया हॉस्पिटल ( ५०), रेल्वे प्रशिक्षण केंद्र (२०), सिंहगड इन्स्टिट्यूट (८००), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (२७५), भारत रत्न इंदीरा गांधी कॉलेज (१९०), आॅर्चिड कॉलेज (१३०), गर्व्हन्मेंट कॉलेज (२८०), वालचंद कॉलेज (५९०).
डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि आॅक्सिजन पुरविणारी यंत्रणा आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- ईएसआय हॉस्पिटल (80), युगंधर हॉस्पिटल (४०), लोकमंगल हॉस्पिटल (५०), रेल्वे हॉस्पिटल (२०), मुळे हॉस्पिटल (२५०), सीएनएस हॉस्पिटल (१००).
डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटलच्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तज्ञ डॉक्टर, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर, बीएलएस रुग्णवाहिका आदीची सोय आहे. श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० बेडची क्षमता आहे. अश्विनी आणि यशोधरा हॉस्पिटल मध्ये प्रत्येकी २५० बेडची क्षमता आहे.
याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरीता कोव्हीड केअर सेंटर म्हणून २५ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणांची बेडची क्षमता ४८६० आहे. डेडिकेटेड हेल्थ सेंटर म्हणून १२ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. येथील बेडची क्षमता ७२९ आहे. डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्चित करण्यात आले असून येथील बेडची क्षमता ७५८ आहे.