जल जीवन मिशनच्या कामास विलंब; १० ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित
By Appasaheb.patil | Published: May 30, 2024 06:27 PM2024-05-30T18:27:18+5:302024-05-30T18:27:33+5:30
जल जीवन मिशन अंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत.
सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची ज्या ठेकेदारांकडे कामे जास्त मंजूर आहेत पण ते इतर ठेकेदारांकडून काम करुन घेत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरची कामे मुदतीत पूर्ण करुन घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करुन संबंधित ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकली जाणार आहेत. शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत सध्या जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे ५ पेक्षा जास्त कामे मंजूर असलेले ३७ ठेकेदार आहेत. या ३७ ठेकेदारांकडे जिल्ह्यात एकूण ४५५ कामे मंजूर आहेत पण हे ठेकेदार सदरची कामे ही स्वतः न करता इतर ठेकेदारांना कामे देऊन त्यांच्याकडून करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठेकेदारांचे जल जीवन मिशन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी पुरवठा योजनांची कामे दिलेल्या विहित वेळेत पूर्ण न होता उलट खूपच विलंब होत आहे.
त्यामुळे या ३७ ठेकेदारांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लेखी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला संबंधित ठेकेदारांनी समर्पक असा वेळेत खुलासा न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन संबंधित या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत नाव टाकली जाणार आहेत.