आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा; गुळवेलचा काढा अन् मिठाच्या गुळण्यांना ग्रामीण भागात पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:38 PM2021-05-24T17:38:15+5:302021-05-24T17:38:25+5:30
कोरोनाशी लढताना आता गावोगावी आजीबाईंच्या बटव्यातील विविध उपचार समोर येऊ लागले आहेत.
सोलापूर : कोरोनाशी लढताना आता गावोगावी आजीबाईंच्या बटव्यातील विविध उपचार समोर येऊ लागले आहेत. परंतु, हे उपचार घेताना अतिरेक होऊ नये याची काळजी घ्या, असे आवाहन आयुर्वेदिक डॉक्टरांनी केले आहे.
आयुर्वेदिक डॉक्टरांच्यामते आपल्याकडे दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण आढळून येतात. त्यामुळे आपल्याकडे पारंपरिक उपचार पध्दती विकसित झालेली आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी याबद्दल पिढी-दर पिढीला याची माहिती सांगत असतात. त्यानुसार सध्या अनेक लोक घरात मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करीत आहेत. गुळवेलचा काढा पित आहेत. सायंकाळी दुधात हळद टाकून पित आहेत. हुलग्याचे माडगे खाल्याने खोकला व सर्दी कमी होत असते असे सांगितले. त्याचाही आधार घेतला जात आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आला, मात्र यादरम्यानच्या काळात गरम पाण्याने गुळण्या केल्याने त्रास न जाणविल्याचीही उदाहरणे आहेत.
दालचिनी, वेलदोडे, मिरी व लवंग एका कपभर पाण्यात टाकायची. हे मिश्रण उकळून घ्यायचे. हे कपभर पाणी पिले, तर ताप येत नाही. काही लोकांनी गुळवेलचा काढा घेण्यास सुरुवात केली. काही लोक लिंबाची पानेही खात आहेत. परंतु, या गोष्टींचा अतिरेक करू नये. जास्त कडू खाल्ल्याने संधिवाताचा धोका असतो. अनेक दिवस गुळवेल घेतल्याने त्वचा कोरडी पडतेय, असे सांगणारे अनेक रुग्णही आमच्याकडे येत आहेत. पारंपरिक पध्दतीने उपचार घ्या, परंतु काही गोष्टींचा अतिरेकही करू नका. प्राणायम, व्यायाम यासह प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा.
- डॉ. सुरेश व्यवहारे, आयुर्वेदिक डॉक्टर.
मी डॉक्टरांकडूनही उपचार घेतले. पण डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांसोबत गुळवेलचा काढा घेत होतो. लिंबाच्या काड्या चघळत होतो. हळद टाकून घरातील मंडळींना काढा दिला होता. सकाळी आणि रात्री मिठाच्या गुळण्या करत होतो. त्यामुळे मी लवकर बरा झालो.
- दत्तात्रय ननवरे, बीबीदारफळ, उत्तर सोलापूर.
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचा काढा घेतला. घसा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याने गुळण्या केल्या. अंडी उकडून खाल्ली. त्यामुळे मी लवकर बरी झाले.
- मंदाकिनी कदम, सोलापूर