‘लोकमत अन् निसर्ग माझा’ मोहिमेतील पल्लांच्या नाजूक चिवचिवाटानं घरांच्या भिंतीही मोहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 02:37 PM2019-03-21T14:37:04+5:302019-03-21T14:40:48+5:30

‘लोकमत’ने राबवलेल्या या उपक्रमातून चिऊताईबद्दल सोलापूरकरांची असलेली आपुलकी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली. 

'Delightful and Nature' campaign, delicate tidiness of the houses, walls of houses | ‘लोकमत अन् निसर्ग माझा’ मोहिमेतील पल्लांच्या नाजूक चिवचिवाटानं घरांच्या भिंतीही मोहरल्या

‘लोकमत अन् निसर्ग माझा’ मोहिमेतील पल्लांच्या नाजूक चिवचिवाटानं घरांच्या भिंतीही मोहरल्या

Next
ठळक मुद्दे मिळालं यश: चिमण्या साºया परत फिरल्या घराकडे आपुल्या.. स्वत: घरटं बनवलं आणि आपापल्या घरी चिमणीसाठी हक्काचा कोपरा दिला

विलास जळकोटकर 

सोलापूर: चार महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने निसर्ग माझा सखा’ परिवाराच्या वतीनं घराघरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढावा, यासाठी ‘तुम्हीच बनवा चिमणीचं घरटं’ ही संकल्पना राबवली. कार्यशाळा घेतली. शेकडो सोलापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वत: घरटं बनवलं आणि आपापल्या घरी चिमणीसाठी हक्काचा कोपरा दिला. जागतिक चिमणी दिनाच्या पूर्वसंध्येला या मोहिमेचं फलित काय? म्हणून शोध घेतला. चार महिन्यांत तब्बल दोनशेहून अधिक चिऊतार्इंनं हे घरटं स्वीकारून आपल्या पिलाबाळांसह संसार थाटल्याचे निदर्शनास आलं आहे.

‘लोकमत’ने राबवलेल्या या उपक्रमातून चिऊताईबद्दल सोलापूरकरांची असलेली आपुलकी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली. 
घरटं बनवण्याच्या कार्यशाळेनंतर ज्यांनी घरटी बनवून चिऊताईचा संसार फुलवला आणि त्यांच्या चिवचिवाटानं आपल्याही त्यांनी घरामधील वातावरण फुलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचं दिसून आलं. अनेकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला फोन करून चिऊतार्इंच्या प्रत्येक हालचालीचं.. तिनं घरटं स्वीकारल्याचं.. पिल्लं झाल्याचं आवर्जून कळवलं. यामध्ये शाळकरी मुला-मुलींपासून गृहिणी, आजीबार्इंचाही उत्स्फूर्त सहभाग असल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना आढळून आलं. 

एकीकडे पर्यावरणाचा ºहास होतो, अशी ओरड होत असताना सोलापूरकरांनी शहरांमधून, अंगणातून दिसेनाशा होणाºया चिमण्यांबद्दल आपुलकीची भावना दाखवत, घरटे बनवण्यापासून ते त्यांच्यासाठी धान्य, पाण्याचीही सोय केली जात असल्याचे चित्र दिसू लागलं आहे. ‘लोकमत’च्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत चिऊतार्इंसाठी हक्काचा कोपरा दिला आहे. 

चिमण्यांचा प्रजनन काळ अन् आयुष्य
- चिमण्या बारा महिने अंडी घालतात. त्यांची वीण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असते. मादी दर खेपेस पाच ते सहा अंडी घालते. त्यांची अंडी द्राक्षाएवढी लहान लहान आणि ती निळसर असतात. अंडी उबविण्याचे काम मादीच करते. साधारणत: १५ दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येते. पिल्ले मोठी होऊन उडू लागली की चिमण्या घरटी सोडून उडून जातात. चिमणीचे वयोमान अवघे ४० वर्षे असल्याचं पर्यावरणप्रेमींनी सांगितलं.

माणसांच्या अगदी जवळ राहू इच्छिणाºया चिमण्या नामशेष होण्याअगोदर आता पुन्हा त्यांना बोलावण्याची ही वेळ आहे. सोलापूर आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून पक्ष्यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या साºयांच्या प्रयत्नांनं चिमण्यांचा ‘चिवचिवाट’ पुन्हा सुरू होईल, अशी खात्री आहे. निसर्ग संवर्धनाचा हा संस्कार आपल्या कृतीतून पुढच्या पिढीला देण्याची गरज आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे चिमण्यांच्या संवर्धनाचा विषय सर्वदूर नक्कीच पोहोचतो आहे.
- अरविंद म्हेत्रे
निसर्ग माझा सखा.

आमच्या घरासमोर चिमण्यांचे घरटे बसवलेले आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. रोज सकाळी चिमण्या आमच्या घरासमोर येतात आणि घरटी स्वीकारलेली आहेत. त्यांचा चिवचिवाट ऐकून आम्हाला खूप छान वाटते. प्रत्येकाने घरासमोर घरटी बसवावित, पाणी ठेवावे. हे आपल्या साºयांचे कर्तव्य आहे.
- वैशाली डोंबाळे (शिक्षिका), सिद्धेश्वर पार्क, जुळे सोलापूर. 

सर्वप्रथम मी लोकमतचे आभार मानते की, लोकमतने सर्व मुलांसाठी चिऊताईसाठी घरटे बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली. त्यामुळे मुलांना काही वेगळे शिकण्यास मिळाले. माझी मुलगी तर खूप आनंदाने हे घरटे बनवण्यास शिकली. ते बनवून आणल्यानंतर आमच्याकडून हट्टाने ते बांधूनही घेतले. आम्हाला अतिशय आनंद आहे की, आम्ही बांधलेले घरटे चिऊताईने स्वीकारले आणि त्यात स्वत:चे घर बनवले. आता तर चिऊताईनं पिल्लांनाही जन्म दिलाय. अगदी सकाळपासूनच चिवचिवाट ऐकायला मिळतो. त्यामुळे आमची सकाळ अतिशय प्रसन्नपणे सुरू होते. दिवसभर त्यांचा चिवचिवाट चालू असतो. त्यांच्यासाठी वेळोवेळी पाणी आणि खावयास तांदूळसुद्धा आम्ही ठेवतो. धन्यवाद!
- अनघा कुलकर्णी, श्रावणी कुलकर्णी, मधुबन नगर, सोलापूर

असाही एक अनुभव..
काँक्रीटच्या जंगलात हरवलेल्या चिऊताईला परत बोलावण्याची गरज निर्माण झालीय. अगदी आमच्या मनातली गोष्ट ओळखून ‘लोकमत’ परिवारानं घरटी बनवण्याची कार्यशाळा घेतली. आम्हाला घरटं बनवण्यासाठी उद्युक्त केलं. कार्यशाळेनंतर घराच्या खिडकीजवळ हे घरटं बसवलं. आश्चर्य म्हणजे चिमणीनं ते स्वीकारून दोन गोंडस पिल्लांना जन्म दिला. एकेदिवशी हे पिल्लू घरट्यातून खिडकीच्या फरशीवर आणि दोन दिवसांनी एकदा त्या खिडकीतून खाली अंगणात येऊन पडले होते. माझे लक्ष गेले. तत्काळ त्याला मांजर किंवा इतर पक्ष्यांनी मारू नये म्हणून लगेच एक बॉटलमध्ये घेऊन पुन्हा खिडकीत ठेवले. चिमणी काही दिवसांपासून रोज तिला भरवत आहे. खरोखरच मला, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या चिमण्यांचा खूपच लळा लागला आहे. यातील एक पिल्लू घरट्यातून उडून गेले आणि आता एक आहे. मुलं रोज शाळेतून आली की, विचारतात पिल्लू आहे का गेलं. चिमण्यांची संख्या अशी कृत्रिम घरटे लावल्याने नक्कीच वाढेल. ‘लोकमत’ आणि निसर्ग माझा सखा परिवाराने राबवलेला उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. 
- अनिल जोशी (अभियंते), मंत्री-चंडक नगर, भवानी पेठ, सोलापूर.

मनुष्य स्वत:साठी पैसे कमावतो. मोठं घर बांधतो. तो देखील त्याला कधी कधी छोटा वाटतो. मग पक्ष्यांसाठीही नको का एखादं छोटं घर?. चिऊताईच्या घरट्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. आम्ही घेतला आहे. बच्चेकंपनीबरोबरच चिमण्यांचाही चिचिवाट वाढला आहे. लोकमतनं घेतलेल्या कार्यशाळेचं हे फलित म्हणावं लागेल. 
- यमुना माने (गृहिणी), जुळे सोलापूर.

चिमण्याच नव्हे तर प्रत्येक पक्ष्याबद्दल आपुलकीचं नातं निर्माण व्हायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये चारा-पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. आपण आपल्या घरात, आजूबाजूला सोय करूयात. आम्हीही ‘लोकमत’च्या कार्यशाळेत चिमणीसाठी घरटं बनवून आणलं. आज या घरट्यामध्ये चिऊताई आपल्या पिल्लांसह राहते आहे. ही आनंददायी बाब आहे. 
- प्रताप यादव, विष्णुपुरी (बॉम्बे पार्क), सोलापूर.

Web Title: 'Delightful and Nature' campaign, delicate tidiness of the houses, walls of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.