बार्शीतील डॉक्टरचे अपहरण करून १० लाखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:16 PM2018-07-11T13:16:51+5:302018-07-11T13:17:12+5:30
१० लाख रुपयांची मागणी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देणाºया तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
बार्शी : येथील डॉ. नंदकुमार रामलिंग स्वामी यांचे अपहरण करून त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देणाºया तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. अन्य दोघे फरार आहेत.
ज्ञानेश्वर उर्फ बप्पा सुरेश लावंड (३१, रा. फुले प्लॉट, बार्शी), उमेश चंद्रकांत मस्तुद (३३, रा. सुभाषनगर, बार्शी) व रंजना तानाजी वणवे (४१, रा. बारामती) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे असून, अनिल शिंदे व सोमा या दोघा फरारींचा शोध पोलीस घेत आहेत.
९ जुलै रोजी दुपारी आरोपींनी ‘तुमच्यावर गर्भलिंग निदान केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात तुम्ही भरपूर पैसे कमावले आहेत. आम्हाला १० लाख रुपये द्या’ अशी मागणी करीत त्यांचे अपहरण करीत १० लाखांची मागणी केली. डॉ. स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींवर भादंवि. ३६४ (अ), ३४१, ३२३ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यातील एमएच-४५/८२१५ व एमएच-४२/वाय १०११ या दोन कार जप्त केल्या.
तिघा आरोपींना सपोनि दिगंबर गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे, सहदेव देवकर यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.
वैद्यकीय व्यवसाय बंद करून शेती
- डॉ. स्वामी हे बार्शीतील दत्तनगर येथे राहत असून, त्यांनी २५ वर्षांपूर्वी निसर्ग उपचार महाविद्यालयातून पदवी घेतली. बार्शीत त्यांनी निसर्गोपचार केंद्र सुरू केले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी ते केंद्रही बंद केले. वैद्यकीय व्यवसाय बंद करून ते शेतीकडे वळले. घटनेच्या दिवशी पेरणी करून आल्यानंतर दुपारी मंगळवार पेठेतून दुचाकीवरून जातेवेळी यातील आरोपींनी त्यांची गाडी आडवी लावून गाडीतील दोघांनी उतरून मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘मी वैद्यकीय व्यवसाय बंद केला आहे’ असे सांगत असतानाही आरोपींनी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली.