अमानवी कृत्याबद्दल टेंभुर्णी पोलिसांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:37+5:302021-05-30T04:19:37+5:30

टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला व पुरुषांना घरातून बोलावून जबरदस्तीने पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा ...

Demand for action against Tembhurni police for inhumane act | अमानवी कृत्याबद्दल टेंभुर्णी पोलिसांवर कारवाईची मागणी

अमानवी कृत्याबद्दल टेंभुर्णी पोलिसांवर कारवाईची मागणी

Next

टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला व पुरुषांना घरातून बोलावून जबरदस्तीने पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावून पोलीस स्टेशनचे कंपाऊंड झाडून काढायला लावले. या अमानवीय कृत्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील मातंग एकता आंदोलन, लहुजी शक्ती सेना संघटना, भीम क्रांती मोर्चा, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना, रिपाइं आठवले गट व रिपाइं (ए)आदी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की शनिवारी दुपारी टेंभुर्णी पोलीस स्टेशनलगत असलेल्या अण्णा भाऊ साठे नगर येथील महिलांना, पुरुष व मुलांना घरी जाऊन आहे त्या अवस्थेत टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पोलीस स्टेशन आवारातील घाण तुम्हीच टाकलेली आहे आणि ती तुम्हीच उचला असे म्हणत जवळपास ५० महिला व लहान मुले यांना शिवीगाळ करून त्यांना संपूर्ण घाण, माणसांची व जनावरांची विष्ठा हाताने उचलायला लावली. महिलांनी कचरा साफ करण्यास नकार देताच दमदाटी करून अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

या कृत्याबद्दल पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व संबंधित कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी जिल्हाधिकारी यांना पाठवल्या आहेत. तसेच या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलिसांनाही देण्यात आले आहे. यावेळी दलित स्वयंसेवक संघाचे अनिल जगताप, वडार पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबा धोत्रे, भीम क्रांती मोर्चाचे महावीर वजाळे, लहुजी शक्ती सेनेचे अनिल आरडे, मातंग एकता आंदोलनचे रामभाऊ वाघमारे, आरपीआय (ए)चे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, आरपीआय आठवले गटाचे संघटक परमेश्वर खरात, राहुल कांबळे, अजिंक्य संगीतराव, वंचित बहुजन आघाडीचे विशाल नवगिरे, डी. एस. एस. चे मोहन कांबळे उपस्थित होते.

---

पोलीस स्टेशन कंपाउंडच्या शेजारी राहणारे काही नागरिक पहाटे कंपाउंडमध्ये येऊन संडास करतात. तसेच महिला लहान मुलांची संडास व कचरा भिंतीवरून कंपाऊंडमध्ये टाकतात. याबाबत त्यांना वारंवार सूचना व दंड करूनही हा प्रकार थांबत नसल्याने पुरुषांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. त्यांच्याच पाठीमागे महिलाही आल्या होत्या.

- राजकुमार केंद्रे

पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी

--

फोटो : २९ टेंभुर्णी

मागण्याचे निवेदन देताना मागासवर्गीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Web Title: Demand for action against Tembhurni police for inhumane act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.