कडब्याचा टेम्पो पेटविणाऱ्याला अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:16+5:302020-12-06T04:24:16+5:30
वैराग : धामणगाव येथे पूर्ववैमनस्यातून कडब्याने भरलेला टेम्पो पेटवून दिल्याप्रकरणी वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील ...
वैराग : धामणगाव येथे पूर्ववैमनस्यातून कडब्याने भरलेला टेम्पो पेटवून दिल्याप्रकरणी वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी हा मोकाट फिरत असून, त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने वैराग पोलिसांकडे केली आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मार्गदर्शक संजय शिंदे आणि परशुराम मब्रुखाने यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वैराग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरुण सुगावकर यांची भेट घेऊन आरोपीला अटक करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले.
२ नोव्हेंबर रोजी धामणगाव (ता. बार्शी) येथील वाहतूक व्यावसायिक तानाजी उत्तम गाडे यांनी एका टेम्पोत कडबा भरून घरासमोर उभा केला होता. गाडे आणि त्यांचे कुटुंब रात्री झोपी गेले होते. घराच्या बाजूला लावलेल्या टेम्पोला मोठी आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी आरडाओरडा करून तानाजी गाडे यांना उठविले. आग भडकत असताना कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. पेटलेली गाडी वाचविण्यासाठी प्रयत्न केला, पण तो असफल ठरला.
गाडे हे बाहेर येताच एक संशयित आरोपी पूर्ववैमनस्यातून कडब्यासह गाडी पेटवून देऊन तो पळून जाताना त्यांच्या निदर्शनास आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या गुन्ह्यातील आरोपी हा अद्याप मोकाट फिरत असून, त्यांच्या कुटुंबीयांना धोका आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीला त्वरित अटक करावी; अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी अक्षय कांबळे, वसंत कांबळे, सुधाकर गवळी, संजय थोरात, शुभम शापवाले, महादेव कांबळे, उत्तम गाडे, तानाजी गाडे उपस्थित होते.
----
फोटो : ०५ वैराग
कडब्याचा टेम्पो पेटविणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना देताना संजय शिंदे, परशुराम मब्रुखाने.