कल्याण फुंदे कुटुंबीयाला २५ लाखांची मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:22 AM2020-12-06T04:22:47+5:302020-12-06T04:22:47+5:30
कोर्टी : करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्र प्राण्याला पकडावे अथवा त्याला ठार मारण्याची वनविभागाने परवानगी द्यावी, मृतांच्या नातेवाईकांना २५ ...
कोर्टी : करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या हिंस्र प्राण्याला पकडावे अथवा त्याला ठार मारण्याची वनविभागाने परवानगी द्यावी, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी सरपंच परिषद करमाळा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तालुका अध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ही मागणी केली. काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात हिंस्र प्राण्याने दहशत निर्माण केली आहे. करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी (फुंदेवाडी) येथील शेतकरी कल्याण फुंदे हे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मरण पावले. फुंदे कुटुंबाला २५ लाखांची तातडीने मदत करावी, शासकीय नियमानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ११(१) नुसार मानवी जीविताला धोकादायक ठरलेल्या अनुसूची - १ मधील वन्य प्राण्यास जेरबंद करणे किंवा बेशुद्ध करणे किंवा ठार मारण्यासाठी तातडीने कारवाई करावी. त्याच्या दहशतीमुळे शेतातील विहीर आणि बोअरवेलला पाणी असूनही पिकांना देण्यासाठी बाहेर पडता येत नाही. जनावरे अक्षरशः दावणीला बांधून आहेत. चारा असूनही त्यांना शेतामध्ये नेता येत नाही. त्यामुळे तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा. वनविभागाचा विशेष टास्क फोर्स बोलावून या बिबट्याची दहशत संपवावी अशी मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केली आहे.