कालबाह्य झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:49+5:302021-04-27T04:22:49+5:30
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सन १९८६ साली अजनाळे (ता. सांगोला) गावठाण हद्दीत सुमारे ४० हजार लीटरची पिण्याच्या पाण्यासाठी टाकी ...
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सन १९८६ साली अजनाळे (ता. सांगोला) गावठाण हद्दीत सुमारे ४० हजार लीटरची पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु लोकसंख्येचा विचार करता पाण्यासाठी टाकीची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे शिरभावी योजनेची दुसरी १ लाख लीटर क्षमतेची टाकी बांधली आहे.
सध्या गाव, वाड्या, वस्त्यांचा विचार करता १ लाख लीटर पाणी कमी पडते म्हणून जुन्या टाकीत २० हजार लीटर पाणी भरून टाकीचा वापर सुरू आहे. दरम्यान, टाकीला ३५ वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना त्या टाकीचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सदरची पाण्याची टाकी तत्काळ पाडावी, अशी मागणी सचिन धांडोरे, चंद्रकांत चंदनशिवे, सर्जेराव धांडोरे, समाधान धांडोरे, शरद धांडोरे, डॉ. सूर्यकांत धांडोरे, सतीश धांडोरे यांनी केली आहे.
कोट ::::::::::::::::
अजनाळे गावठाण हद्दीतील पाण्याच्या टाकीचा कालावधी संपला आहे. सध्या या टाकीत २० हजार लीटर पाणी भरून गावाला पाणीपुरवठा होतो. टाकीची अवस्था लक्षात घेता सदरची टाकी पाडून त्या ठिकाणी नवीन टाकीची उभारणी करावी. मासिक मीटिंगमध्ये याबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.
- संदीप सरगर,
ग्रामसेवक, अजनाळे
फोटो ओळ :::::::::::::
अजनाळे गावठाण हद्दीतील कालबाह्य झालेली हीच पाण्याची टाकी पाडावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.