सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना पिवळी, केशरी शिधापत्रिका देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:12+5:302020-12-06T04:23:12+5:30
सोलापूर : सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सामान्य जीवन जगावे लागते. बहुतांश अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या पाल्यापासून दुरावलेले आहेत. ...
सोलापूर : सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सामान्य जीवन जगावे लागते. बहुतांश अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या पाल्यापासून दुरावलेले आहेत. काही कर्मचारी आश्रमात जीवन जगत आहेत. काहीजण दुर्धर आजाराशी झगडत आहेत. उपचारासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका मिळावी, अशी मागणी कृतिशील सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष पी.डी. सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून संस्थेच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात खजिनदार नामदेव थोरात, सरचिटणीस रमाकांत साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी होते.
शासन धोरणाप्रमाणे वार्षिक उत्पन्न लाखावर असल्यास त्यांना पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका देण्यात येते. सेवानिवृत्ती वेतन हे जगण्यासाठी असलेला उदरनिर्वाह भत्ता आहे. त्याला उत्पन्नाची रक्कम म्हणून पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकेत त्यांची गणना झाली आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येत नाही. हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फटका बसतोय. सरासरी सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिवळी व केशरी शिधापत्रिका देण्यात यावी. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल. सेवानिवृत्ती नंतरचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल, असे संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.