पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:35+5:302021-02-06T04:39:35+5:30
करमाळा तालुक्यातील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादित झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत केळीला चांगला दर मिळत होता; परंतु यावर्षीच्या ...
करमाळा तालुक्यातील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादित झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत केळीला चांगला दर मिळत होता; परंतु यावर्षीच्या हवामान बदलाचा परिणाम या पिकावर झाला असून, केळी निर्यातीसाठी अडचणी येऊ लागल्याने केळीचा स्थानिक बाजारपेठेतील दर घसरला आहे. सध्या तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये किलोप्रमाणे केळी विकण्याची वेळ आलेली आहे. हे लक्षात घेऊन शालेय पोषण आहार व महिला बाल विकास विभागाच्या वतीने येणाऱ्या अंगणवाडी व स्तनदा माता यांना मिळणाऱ्या आहारात केळीचा समावेश करून शासनाच्या वतीने अथवा शेतकरी गटाच्या वतीने शेतकऱ्यांची केळी योग्य दरात खरेदी करण्याची मागणी शेटफळ तालुका करमाळा येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष विष्णू पोळ, विजय लबडे, नानासाहेब साळुंके, गजेंद्र पोळ, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, महावीर निंबाळकर यांनी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले. यावेळी केळी उत्पादकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
फोटो ओळी: ०४करमाळा-केळी निवेदन
करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देताना विष्णू पोळ, गजेंद्र पोळ, विजय लबडे नानासाहेब साळुंके, महावीर निंबाळकर.