कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळे घोटाळा, संजय कोकाटे यांची चौकशी करण्याची मागणी; सभापती संजय शिंदे यांच्यावर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:13 PM2018-02-17T13:13:09+5:302018-02-17T13:14:59+5:30
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. भाडे वसुलीची पावतीपुस्तके समितीकडे उपलब्ध नसल्याची निरीक्षणे लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आली आहेत. इतर अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यातून बाजार समितीत ४० ते ४५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष तथा कुर्डूवाडी बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संजय कोकाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणांना बाजार समितीचे सभापती संजय शिंदे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोकाटे म्हणाले, शासनाने आमची तज्ज्ञ संचालक म्हणून कुर्डूवाडी बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती केली. समितीच्या बैठकीला गेल्यानंतर अनेक संचालक अनुपस्थित असल्याचे लक्षात आले. पुढील बैठकीत मात्र हे संचालक हजर असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. त्यांना या बैठकीचा भत्ताही मंजूर असल्याचे दिसले. समितीच्या लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेतली. बाजार समितीच्या मिळकतीवर शेतकरी व शेतीविषयक सेवा देण्यासाठी प्रयोजन आवश्यक आहे. परंतु अनेक जागांच्या वापरात परस्पर बदल करण्यात आले आहेत. बरीच जागा वापरात असताना खुली दाखवली आहे. १७ एकर जागेत शॉपिंग सेंटर बांधून ७०० ते ८०० गाळे विकले आहेत. यातील बहुतांश गाळे आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. गरीब माणसांना जास्त भाडे आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना कमी भाडे आकारले जाते. टेंभुर्णी येथील बाजार समितीच्या जागेत रणजितसिंह शिंदे यांच्या माध्यमातून गॅस गोडावून करण्यात आले आहे. या गोदामात ज्वालाग्रही पदार्थ आहेत. अनुचित प्रकार घडल्यास पूर्ण टेंभुर्णी गावाचे भवितव्य धोक्यात येईल, असा आरोपही कोकाटे यांनी केला. पत्रकार परिषदेला नागनाथ कदम, धनंजय महाडिक उपस्थित होते.
---------------------------
कोकाटे यांचे इतरही आक्षेप
- बाजार समितीचे सचिव रघुनाथ कदम यांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. असे असताना गैरप्रकार, जमीन बांधकाम गैरव्यवहार लपविण्यासाठी त्यांची खोटी कागदपत्रे करुन सेवानिवृत्ती करण्यात आलेली नाही.
- कुर्डूवाडी बाजार समितीचे टेंभुर्णी, मोडनिंब, माढा येथील पोटभाडेकरुंचे करार नाहीत. खोटी पावतीपुस्तके छापून वसुली केली जाते. वसूल रकमेचाही हिशोब नाही.
- २००६ ते २०१७ पर्यंतच्या लेखापरीक्षणाची तपासणी व्हावी. बांधकामाचेही लेखापरीक्षण व्हावे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाºया लेखापरीक्षकाचीही चौकशी व्हावी.
- बाजार समितीची जमीन, व्यवहारांची निष्पक्ष तपासणी होईपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करावे.