माल धक्क्यामुळे स्थानिक मालाची मागणी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:37+5:302021-02-12T04:21:37+5:30
दुधनी रेल्वे स्टेशन येथे माल धक्क्यास मंजुरी मिळाली असून, बुधवारी या प्रकल्पाचा शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांच्या हस्ते मातोश्री ...
दुधनी रेल्वे स्टेशन येथे माल धक्क्यास मंजुरी मिळाली असून, बुधवारी या प्रकल्पाचा शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांच्या हस्ते मातोश्री शुगरच्या कोलकत्ता येथे जाणाऱ्या साखर पोत्याच्या पूजनाने झाला.
याप्रसंगी रेल्वेचे एस.एस.सी (पीडब्ल्युएवाय) दुधनी इनचार्ज विनोदकुमार, सी. पी. ठेकेदार महेश कोनापूरे, परेश सुराणा, सिद्धेश्वर मुनाळे, बुकिंग सुपरवायझर सी. के. वेलुकेशवन, पं. स. सदस्य आनंदराव सोनकांबळे, दत्ता डोंगरे, राजकुमार लकाबशेट्टी यांची उपस्थिती होती.
२०१५ पासून दुधनीत माल धक्का सुरु व्हावा म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. रेल्वेची डबल लाईन सुरु झाल्याने मालवाहतुकीस सोयीस्कर होणार आहे. या धक्क्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री शुगर, गोकुळ शुगर, गोकुळ माऊली शुगर, जय हिंद शुगर, कर्नाटकतील रेणुका शुगर, एन. एस. एल शुगर भुसनूर, के. पी. आर शुगर आलमेल, जमखंडी युनिट -२, मनाली शुगर जमखंडी, बेनूर येथील कारखान्यांची साखर देशातील वेग-वेगळ्या राज्यात पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. एका हंगामात या कारखान्याचा रेल्वेने साखर नेल्यास सुमारे साठ लाख गोणींची निर्यात होऊ शकते. यामुळे रेल्वेच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. दुधनीत मोठी बाजारपेठ असल्याने येथील मार्केटमधील व्यापारालाही नवी दिशा मिळणार आहे.
याप्रसंगी गुलाबसाब खैराट, रामचंद्र गद्दी, गुरुशांत हबशी, दयानंद म्हेत्रे, शांतलिंगा परमशेट्टी, शंकर राठोड, रवी नारायणकर, विश्वनाथ हडलगी, हमाल संघटना अध्यक्ष सुरेश बडदाळ आदिंसह परिसारातील नागरीक उपस्थित होते.
----
४०० मजुरांना मिळणार रोजगार
या माल वाहतुक धक्क्यावर सुमारे ४२ वॅगन एका वेळेस लोडिंगसाठी उभे राहू शकतात. येथील ४०० मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये फर्टिलायझर व्यवसायासही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मालाची निर्यात करण्यास फायदा होणार आहे. शहरातील उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे.
----
माल धक्का सुरु करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यास मंजुरी मिळली. यामुळे अक्कलकोट तालुक्यतील शेतकरी, व्यापारी, कारखानदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. निर्यातीचा खर्च कमी होत असल्याने कारखानदारांना, शेतकऱ्यांना दर वाढवून मिळू शकतो.
- सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री
----११दुधनी-मालधक्का---