कोरोना औषधोपचारासाठी वैद्यकीय कर्ज देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:30+5:302021-05-17T04:20:30+5:30
अक्कलकोट : अडचणीच्या काळात संस्थेचे सभासद आणि कुटुंबातील व्यक्तींना कोरोनासह इतर गंभीर आजाराच्या औषधोपचारासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून किमान पाच लाखांपर्यंत ...
अक्कलकोट : अडचणीच्या काळात संस्थेचे सभासद आणि कुटुंबातील व्यक्तींना कोरोनासह इतर गंभीर आजाराच्या औषधोपचारासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून किमान पाच लाखांपर्यंत वैद्यकीय कर्ज उपलब्ध करून देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने चेअरमन आणि सचिव सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेकडे केल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली.
आर्थिक अडचणींच्यावेळी मदतीच्या अपेक्षेने सभासद संस्थेकडे पाहतात. या काळात शिक्षक सभासदांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटे येत आहेत. जवळपास २२ प्राथमिक शिक्षकांचे निधनही झाले आहे. भविष्यात सभासदांना मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. ह्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षक सभासदांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा सर्वेक्षण, लसीकरण, चेकपोस्ट आणि इतर कामाच्या निमित्ताने अनेक शिक्षक सभासद आणि त्यांचे कुटुंबीय बाधित होत आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या काळात पतसंस्थेने मदत करून शिक्षक सभासदांची आर्थिक गरज पूर्ण करावी.
यासाठी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवून नवीन पोटनियम स्वीकारून गरजू सभासदांना वैद्यकीय कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रहास चोरमले, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे आणि रंगनाथ काकडे यांनी स्वाक्षरी केली आहे.