नियम, अटी घालून मोहोळमध्ये दुकाने सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:40+5:302021-06-06T04:16:40+5:30
मोहोळ : शहरात बिगर जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी द्यावी, किराणा मालाच्या ...
मोहोळ : शहरात बिगर जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी द्यावी, किराणा मालाच्या दुकानाची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी मोहोळ येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. हीच मागणी आ. यशवंत माने यांच्याकडे करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच महिन्यांपासून शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक संकटास तोंड द्यावे लागत आहे. राज्यामध्ये इतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि बिगर जीवनावशक वस्तू विक्रीची दुकाने नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर मोहोळ शहरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर सध्या किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. ती वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी २ अशी पाच तास करावी. त्याचबरोबर बिगर जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, सचिव हरिश्चंद्र बावकर, महेश आंडगे, बबलू शेख, अनिल कोरे, अभिजित बावकर, अतुल गावडे, अण्णा फडतरे उपस्थित होते.
---
फोटो : ०५ मोहोळ
नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना निवेदन देताना चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, हरिश्चंद्र बावकर, महेश आंडगे, अण्णा फडतरे, अनिल कोरे.