पतीला जेल मधून सोडविण्यासाठी पत्नीकडे ७२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:44 AM2018-03-08T11:44:38+5:302018-03-08T11:44:38+5:30
सोलापूर जिल्ह्यातील घटना, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल
पंढरपूर : पतीला जेलमधून सोडविण्यासाठी पत्नीकडे ७२ लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्याविरुध्द संबंधीत महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर उर्फ भैय्या शिवाजीराव देशमुख (रा. पाटकुल, ता. मोहळ), सचिन कारंडे, अनिल झुंजार (रा. पंढरपूर) व अनोळखी इसमाने संगणमत केले. त्यापैकी प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख व अनोळखी इसमा हे २५ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री पाऊणे दहाच्या सूमारास पिडीत महिलेच्या घराजवळ आले. व त्यांनी तडजोडीची भाषा वापरुन नंतर पिडीतीचे पती तुकराम कोळी यांना झेलमधून सोडवण्याचे खोटे कारण समोर करुन सर्व केसेस संपवितो.
तुम्ही घाबरु नका असे म्हणून ७२ लाख रुपये द्या असे म्हणून खंडणीची मागणी केली. ही खंडणी न दिल्यास तुमचे जगणे मुश्किल करुन टाकीन, हस्ते परहस्ते इतरांकडून जीवाला घातपात करण्याची धमकी दिली आहे. तसेच पिडीत महिला व तुकाराम कोळी यांना वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यांच्या मालीकेत आयुष्यभर खडी फोडायला पाठवितो, अशी धमकी दिली आहे. यामुळे प्रभाकर उर्फ भैय्या शिवाजीराव देशमुख (रा. पाटकुल, ता. मोहोळ), सचिन कारंडे, अनिल झुंजार (रा. पंढरपूर) व अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. शाम बुवा करीत आहेत.