करमाळा पोलीस वसाहतीची दुर्दशा हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:26+5:302021-07-09T04:15:26+5:30
करमाळा : करमाळ्यातील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. खोल्यांच्या भिंतींना तडे गेले असून, पावसाळ्यात पत्रे गळतात. अपुरे शौचालय व ...
करमाळा : करमाळ्यातील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. खोल्यांच्या भिंतींना तडे गेले असून, पावसाळ्यात पत्रे गळतात. अपुरे शौचालय व पाण्याच्या टंचाईच्या गैरसोयीला पोलीस बांधव तोंड देत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कैफियत मांडली आहे.
करमाळा तालुक्यातील पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब सुरक्षित नाही. या विषयाकडे करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे लक्ष वेधले. या वसाहतीत पोलीस कर्मचारी हे लहान मुलांना घेऊन वास्तव्य करीत आहेत.
ऐन पावसाळा सुरू असून, या काळात संपूर्ण वसाहत गळते. त्यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे, अहोरात्र काम करणारे पोलीस बांधव यांचे कुटुंबीय सुरक्षित नसल्याचे चित्र करमाळा तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. ही कैफियत मांढरे-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन मांडली.
----
फोटो : ०८ करमाळा
करमाळा पोलीस वसाहतीची दुर्दशा हटविण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करताना हनुमंतराव मांढरे.