माढा, शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयाला डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:12+5:302021-04-22T04:22:12+5:30
कुर्डूवाडी : माढा आणि मोहोळ तालुक्यात डेडिकेटेड कोविड सेंटर उभारावे आणि मोडनिंब, शेटफळ परिसरातील विविध गावांना कोरोनाच्या उपचारासाठी ...
कुर्डूवाडी : माढा आणि मोहोळ तालुक्यात डेडिकेटेड कोविड सेंटर उभारावे आणि मोडनिंब, शेटफळ परिसरातील विविध गावांना कोरोनाच्या उपचारासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
माढा व शेटफळ (ता. मोहोळ) येथे सर्व सोयींनीयुक्त ग्रामीण रुग्णालये उपलब्ध आहेत. या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर सुविधा, ऑक्सिजन बेड, एक्स-रे मशीन व अवश्यक असा कर्मचारीवृंददेखील उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी सध्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. तसेच शेटफळ (ता. मोहोळ) येथील रुग्णालयात ना रुग्णांची पूर्ण तपासणी केली जाते, ना लसीकरण केले जाते. त्यामुळे संबंधित दोन्ही ठिकाणच्या सर्व यंत्रणा किरकोळ दुरुस्ती वाचून या महामारीच्या काळातही धूळखात पडून आहेत.
मोडनिंब व शेटफळ परिसरात दररोज जवळपास १०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करणे सर्वसामान्यांना अतिशय अवघड आहे. उपचारावर सर्वसामान्यांना लाखो रुपये खर्च करणे परवडत नाहीत. जिल्ह्यात कोणत्याही रुग्णालयात स्वत:चे ऑक्सिजन उपलब्ध नाहीत. माढा व शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून सुरू करावीत अन्यथा २३ एप्रिल रोजी मोडनिंब येथे कोरोना बाधित रुग्णांना समवेत आंदोलन करू, असा इशाराही शिवाजी कांबळे यांनी दिला आहे.
शासनाच्या माध्यमातून वरील दोन्ही ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होणार आहे. शासनाच्या माध्यमातून इंजेक्शनचा ही पुरवठा होईल.