पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:46 IST2025-03-17T18:45:47+5:302025-03-17T18:46:11+5:30

चौकशी होऊन अभिजीत पाटील यांच्यावर राज्य शासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे.

Demand to register a case against sharad Pawars NCP MLA Abhijit Patil What exactly happened | पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?

पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?

पंढरपूर : "दिल्लीतून औरंगजेबाला आणून त्याची कबर महाराष्ट्रात करावी लागली. हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे," असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. "हे वक्तव्य केवळ राजकीय लाचारीतून केले असून, त्यांच्या पक्षाचा हा अनेक वर्षांपासूनचा छुपा अजेंडाच आहे. आपली मतपेढी कमी होऊ नये, यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याची चौकशी होऊन त्यांच्यावर राज्य शासनाने गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी भावना व्यक्त केली होती. राज्यभरातील जनतेने याला पाठिंबा दिला असताना आमदार पाटील यांनी औरंगजेबाची कबर शौर्याचे प्रतीक असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. खरेतर, अफजलखानाने महाराष्ट्रात आल्यानंतर आई तुळजाभवानी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरही हल्ला केला होता. याच अफजलखानाच्या तावडीतून संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरनजीक असणाऱ्या देगाव येथील सूर्यकांत पाटील यांच्या विहिरीत लपवून ठेवली होती. या सूर्यकांत पाटील यांचे वंशज म्हणून विद्यमान माढ्याचे लोकप्रतिनिधी अभिमानाने सांगतात. एकीकडे श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले म्हणायचे आणि दुसरीकडे स्वराज्याचा विरोधक असणाऱ्या औरंगजेबाची कबर शौर्याचे प्रतीक मानणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो," असं भाजपच्या प्रशांत देशमुख, माउली हळणवार यांनी सांगितले.

अभिजीत पाटलांनी काय स्पष्टीकरण दिलं?

वादाविषयी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल बोललो आहे. परंतु माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमसभा घेतली. परंतु विरोधकांनी त्याबाबत चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या," असा दावा पाटील यांनी केला.

Web Title: Demand to register a case against sharad Pawars NCP MLA Abhijit Patil What exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.