सोलापूर विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात निदर्शने
By Appasaheb.patil | Published: February 14, 2023 04:48 PM2023-02-14T16:48:25+5:302023-02-14T16:48:55+5:30
उद्यापासून काळ्या फिती लावून काम करणार; मागण्यांबाबत कर्मचारी आक्रमक
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २ ते २.३० दरम्यान आपापल्या महाविद्यालयाच्या गेटवर निदर्शने केली.
राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रमुख ६ मागण्यासाठी २ फेब्रुवारीपासून परीक्षेवरील बहिष्कार आंदोलन सुरू आहे. मंगळवारी सर्व कर्मचारी आपापल्या महाविद्यालयाच्या गेटवर जमा झाले. मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी घोषणा दिल्या. या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी (दि.१५) सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील, असे संयुक्त कृती समितीच्या वतीने सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे.
या आहेत प्रमुख सहा मागण्या-
१) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.
२) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.
३ ) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.
४) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.
५) २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
६) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा