सत्ताधारी भाजपच्या कारभारावर खुद्द उपमहापौर राजेश काळेंची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:27 AM2020-06-24T11:27:26+5:302020-06-24T11:34:25+5:30
फडणवीसांना पत्र : सोलापूर महापालिकेत स्थायी समिती, झोन समिती गठीत करा
सोलापूर : राज्य सरकारला धारेवर धरण्याची तयारी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात येत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेच्या कारभारातील त्रुटी दूर कराव्यात, असे पत्र फडणवीस यांना दिले आहे.
शहरातील कोरोनाच्या स्थितीला भाजपचे पदाधिकारी जबाबदार असल्याची टीका काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक करीत आहेत. मात्र या प्रकाराला राज्य शासन जबाबदार असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर राजेश काळे यांनी थेट फडणवीसांना पत्र दिले आहे. काळे म्हणाले, महापालिकेत भाजप सत्तेत आल्यापासून कोणतीही झोन समिती स्थापन करण्यात आली नाही. प्रभागाच्या सीमा निश्चित नसल्याने नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांना नाहक रोषाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून स्थायी समितीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. ही समिती अस्तित्वात नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. याबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत. भाजप सत्तेत आल्यापासून शिक्षण समिती गठीत करण्यात आली नाही. शिक्षण मंडळाकडील निर्णय घेणे अवघड जाते. शिक्षण मंडळाकडे चाललेला कारभार माहित होत नाही. याबद्दल तत्काळ निर्णय व्हायला हवा. तुमच्याकडून तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी काळे यांनी केली आहे.