कर्तव्यात कसूर केली! पोलीस झाला निलंबित, शांततेस बाधा
By रवींद्र देशमुख | Published: March 2, 2024 06:37 PM2024-03-02T18:37:40+5:302024-03-02T18:37:44+5:30
पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगीविना बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात ‘शिवराम चौक’नावाचा बोर्ड लावला.
सोलापूर: शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज वाढवण्याबद्दल समुदायाला भडकावून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस मुख्यायातील पोलीस अंमलदार काशिनाथ विष्णूपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यांना कलम १३५ अन्वये पोलीस आयुक्ताच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले. याशिवाय शांततेला बाधा आणण्याचे काम केल्याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते गणेश वानकरसह रवी कोटमुळे यांच्या विरोधातही कलम १८६,१८८, १२० ब सह कारवाई करण्यात आली.
या आदेशात म्हटले आहे की, पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगीविना बेकायदेशीररित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात ‘शिवराम चौक’नावाचा बोर्ड लावला. तसेच १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तालयात मंडळाचे अध्यक्ष, साऊड चालक-मालक यांची बैठक आयोजित करुन साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादेत ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक बेस लावून नयेत अशी सूचना केली होती. मिरवणुकीत मंडळास तसेच गणेश वानकर व इतरांना भडकावून आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे. नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही अशी चिथावणीखोर भाषा वापरल्याचे आदेशात म्हटले आहे.
लेझीम खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा
२ जून २०२३ रोजी हिंदू साम्राज्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आपण बंदोस्तास नसतानाही सहभागी झालात. लेझीम खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा येईल, असे कृत्य केल्याचे या आदेशामध्ये नमूद केले आहे.