मोठी बातमी! सोलापूर बाजार समितीत देशमुखांना, तर बार्शीत राऊतांना सहा महिन्याची मुदतवाढ
By विठ्ठल खेळगी | Published: June 15, 2023 05:14 PM2023-06-15T17:14:22+5:302023-06-15T17:14:54+5:30
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत १५ जुलै रोजी संपणार आहे. तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांची मुदत २३ जुलै रोजी संपणार आहे.
सोलापूर : सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळांना राज्य शासनाने पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला असून सोलापूर बाजार समितीत आमदार विजयकुमार देशमुख आणि बार्शी बाजार समिती आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाला आणखी सहा महिने कारभार करायला संधी मिळाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत १५ जुलै रोजी संपणार आहे. तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांची मुदत २३ जुलै रोजी संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया राबविणे अपेक्षित होते मात्र निवडणूक प्रक्रिया पार न पडल्याने आणि आता पावसाळ्यामध्ये निवडणुका घेता येत नसल्याचे कारण देत राज्य शासनाने विद्यमान संचालकांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी दोन्ही बाजार समितीच्या वतीने मुदत वाढीसाठी जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. यावर मागील काही दिवसापासून मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मुदत वाढीसंदर्भात पणन विभागाच्या सहसचिवांनी आदेश काढला आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समिती सभापती आमदार विजयकुमार देशमुख व बार्शी बाजार समितीत आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव सभापती रणवीर राऊत यांना आणखी सहा महिने कारभार करता येणार आहे.