धोकादायक; दोघांचे बळी जाऊनही सोलापूर शहरातून जडवाहतूक सर्रास सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:00 PM2020-06-29T15:00:07+5:302020-06-29T15:06:17+5:30
बायपास रोड बनतोय धोकादायक; लॉकडाऊनमध्ये वाहतुकीला बंधनच नाही
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : लॉकडाऊनपूर्वी अन् लॉकडाऊनमध्ये... पूर्वी जडवाहतुकीला शहरात येण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये मात्र वेळेचे बंधनच नाही. दिवस-रात्र जडवाहतूक होत असताना बायपास रोड धोकादायक बनतोय. जून महिन्यात दोघांचे बळी जाऊनही पोलीस प्रशासन मात्र गप्पच आहे, असा सूर नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे.
लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यावर शहर व ग्रामीण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशात पुन्हा एकदा शहरातील नागरिकांसाठी सर्वच बायपास रस्ते धोकादायक बनले आहेत. नेहमी वर्दळ असलेल्या बायपास रस्त्यांवर पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. दुपारी एक ते चारपर्यंत जड वाहतुकीला परवानगी आहे. पुन्हा सायंकाळी ४ ते ७ पर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. सायंकाळी सातनंतर जड वाहतुकीला मार्ग मोकळा असतो, परंतु या वेळेचे पालन जड वाहतूक वाहन चालक करत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
विजापूर रोड ते महावीर चौक, गुरुनानक चौक, अशोक चौक, डब्ल्यूआयटी कॉलेज, शांती चौक, बोरामणी चौक, दयानंद कॉलेज, रुपाभवानी मार्ग, तुळजापूर रोड तसेच बोरामणी चौक ते हैदराबाद रोड आणि शांती चौक ते अक्कलकोट रोड या मार्गावर वारंवार अपघात होत असतात.
जड वाहतुकीवर नियंत्रण आले होते...
सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे यांनी व्यापक जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाला काहीकाळ जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे लागले. अशोक इंदापुरे म्हणतात, जून महिन्यात जड वाहतुकीने दोघांचे प्राण घेतले.प्रशासनाने याकडे कानाडोळा करू नये. सोलापूर शहरातील चौकाचौकातील सिग्नलजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यांचा उपयोग करावा तसे चौका-चौकात वाहतूक पोलिसाची व्यवस्था करावी.
नोंदी होत नाहीत..
शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाºया जड वाहतुकीमुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक अपघात झालेले आहेत. यातून तीनशे लोकांचा जीव गेला असून, साडेसातशेहून अधिक नागरिकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे. यात सर्वाधिक शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींचा समावेश आहे. इतर किरकोळ स्वरुपाच्या अपघाताची नोंद राहत नाही.