नियतीचा घात अन् सहकाऱ्यांचा मदतीचा हात; मंगळवेढा पोलीस संघटनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 08:45 AM2020-11-05T08:45:37+5:302020-11-05T08:48:19+5:30
माणूसकी; 'त्या ' कुटुंबियाच्या घरी जाऊन ३२ हजार रुपयाची ठेव पावती केली सुपूर्द
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : अंत्यत हालाकीच्या परिस्थितीतुन नोकरीस लागलेल्या कुटूंबप्रमुख असणाऱ्या सुनील शिंदे यांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, अशा निराधार झालेल्या शिंदे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मंगळवेढा तालुका पोलिस पाटील संघटनेच्यावतीने ३२ हजार रुपयांची मदतीची मुदत ठेव पावती मेंटकरवाडी येथे त्या कुटुंबियांच्या घरी जाऊन पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या हस्ते आई अक्कताई शिंदे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबाला ही मदत म्हणजे नियतीचा आघात अन् सहकाऱ्यांचा मदतीचा हात अशीच ठरली आहे.
मेटकरवाडीचे तरुण पोलीस पाटील सुनील शिंदे यांचे नुकतेच दुर्देवी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर प्रचंड आघात झाला. त्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मंगळवेढा पोलीस पाटील संघटना, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांच्या सहकार्यातून मयत सुनील शिंदे यांच्या मातोश्री अक्काताई शिंदे यांच्याकडे मदत निधीचे एफ. डी. प्रमाणपत्र पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
संकटसमयी तालुक्यातील पोलीस पाटलांना वाऱ्यावर सोडणार नाही. पोलीस विभागाच्या मदतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शशांक गवळी यांनी शिंदे यांच्या कागदपत्राची पूर्तता करून शासकीय नियमाप्रमाणे सर्व सुविधा मिळवून देण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष आनंद रायबान, संजय गरंडे, आनंद कोळेकर, पद्माकर बनसोडे, रमेश पाटील, भागवत बेलदार, प्रशांत पाटील उपस्थित होते.