तीर्थक्षेत्र विकासाबरोबर कृषी विकासाची नवी पहाट होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:32+5:302021-02-11T04:23:32+5:30
भाग -२ लोकमत न्यूज नेटवर्क माळशिरस : लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामुळे रेल्वे मार्गाच्या स्वप्नांना उजाळा ...
भाग -२
लोकमत न्यूज नेटवर्क
माळशिरस : लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. यामुळे रेल्वे मार्गाच्या स्वप्नांना उजाळा मिळत आहे. या मार्गावरील रेल्वेमुळे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील नवा पट्टा विकसित होणार आहे. यात तीर्थक्षेत्र विकासाच्या संकल्पनेबरोबरच या पट्ट्यात कृषी विकासाची नवी पहाट होणार आहे. मात्र या बहुचर्चित रेल्वेसाठी आणखी किती पिढ्यांना प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्ग पालखी मार्गाला समांतर असल्याने पंढरपूरच्या वारीचा इतर मार्गावरचा ताण कमी होणार आहे. याशिवाय शिखर शिंगणापूरच्या चैत्री यात्रेसाठी भाविकांना वरदान ठरणार आहे. तसेच मार्गालगतच्या परिसरात डाळिंब व केळी अलीकडे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. याशिवाय दररोज शेकडो टन भाजीपाला पुणे व मुंबई या शहराकडे जातो आहे. या मार्गालगत रुजलेल्या साखर कारखानदारीमुळे रेल्वे शेतीसाठी मोठे वरदान ठरणार आहे. मात्र सध्या तरी या मार्गाकडे सर्वसामान्यांचे डोळे लागून आहेत.
जर-तरच्या रेल्वे प्रवासाची थट्टा
सध्या फलटण-पंढरपूर रेल्वेकडे एरंडाचं गुऱ्हाळ म्हणून पाहिलं जात आहे. तीन पिढ्यांनी या मार्गाचं रखडलेल स्वप्न पाहिल आहे. जुन्या सर्वे झालेल्या मार्गावर अनेक ठिकाणी वसाहती तयार झाल्या आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेल्या नव्या सर्वेसाठी काही ठिकाणी विरोध केला जात आहे. यातच केंद्र व राज्य सरकारची टोलवाटोलवी, अशा अनेक गोष्टी जर उलगडल्या तरच या रेल्वेचे स्वप्न सत्यात येणार आहे. अन्यथा लोणंद-पंढरपूर रेल्वे हे एक स्वप्न ठरणार आहे.
कोट ::::::::::::::::
लोणंद-पंढरपूर हा प्रकल्प तीर्थक्षेत्र विकासाबरोबर औद्योगिकीकरण व कृषी क्षेत्रासाठी नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. हा मार्ग रखडल्यामुळे या पट्ट्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. यासाठी रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. या मार्गावर रेल्वे धावल्याशिवाय लढा थांबविला जाणार नाही.
- ॲड. सोमनाथ वाघमोडे
अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती