जिल्हा वार्षिक योजनेत ७४५ कोटींचा विकास आराखडा तयार -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
By संताजी शिंदे | Published: May 1, 2023 04:28 PM2023-05-01T16:28:26+5:302023-05-01T16:28:46+5:30
सोलापूरची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
संताजी शिंदे, सोलापूर: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. सन २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी जवळपास ७४५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात चांगली प्रगती करत सोलापूर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कृषि क्षेत्रात जिल्ह्याची भरीव कामगिरी सुरू आहे. गेल्या वर्षी देशभरातून केळीचे सुमारे १६ हजार कंटेनर्स निर्यात झाले. त्यापैकी ५० टक्के कंटेनर्स एकट्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव केळीचे हब बनलेले आहे, याबद्दल अभिमान व्यक्त करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, बळीराजाला बळ देण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांतून एकूण ४२ हजार ७३० शेतकऱ्यांना १९८ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अदा केलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
उन्हाळी हंगामासाठी कालवा प्रवाहीसाठी तीन आवर्तनांसह चालू सिंचन वर्षामध्ये सिंचनाची एकूण पाच आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेती उत्पादनात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करून शंभरकर म्हणाले, विहित मुदतीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मागील वर्षी एकूण ३१ हजारहून अधिक शेतकऱ्यांना साडेसोळा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर गत वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी १९१ कोटी ७३ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच चालू वर्षी मार्च व एप्रिलमध्येही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये ३ कोटी ९२ लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही अनुदाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.