विकास कामांवरून राष्ट्रवादी अन् गट नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:31+5:302021-09-16T04:28:31+5:30

सांगोला नगर परिषदेची ३१ डिसेंबर २०२१ला मुदत संपत आहे. दरम्यान, गेल्या चार-साडेचार वर्षाच्या काळात श्रेयवादावरून विकासकामे ठप्प झाली आहेत. ...

From the development works, allegations and counter-allegations started circulating among the NCP leaders | विकास कामांवरून राष्ट्रवादी अन् गट नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या

विकास कामांवरून राष्ट्रवादी अन् गट नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या

Next

सांगोला नगर परिषदेची ३१ डिसेंबर २०२१ला मुदत संपत आहे. दरम्यान, गेल्या चार-साडेचार वर्षाच्या काळात श्रेयवादावरून विकासकामे ठप्प झाली आहेत. नगर परिषदेसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होऊन २८ नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. निवडणुकीत नगराध्यक्षा या आमदार शहाजीबापू पाटील, श्रीकांत देशमुख, आनंद माने, प्रा. संजय देशमुख यांच्या शिवसेना-भाजप-स्वाभिमानीच्या महायुतीतून निवडून आल्या होत्या. तर महायुतीतून ७ नगरसेवकही निवडून आले होते.

शेकापचे स्व. माजी आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, काँग्रेसचे प्रा. पी.सी. झपके यांच्या महाविकास आघाडीतून ११ नगरसेवक निवडून आले होते. तर एका अपक्षाचा विजय झाला होता. नगर परिषदेत नगराध्यक्ष महायुतीच्या तर बहुमत महाविकास आघाडीचे असल्याने विकास कामात आडकाठी येऊ लागली होती. त्यामुळे पहिली तीन वर्षे एकमेकांचे पाय ओढण्यात गेली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडी यांच्यात समझोता होऊन नगरपालिकेत एकदिलाने काम करण्याचे ठरले. तरीही ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणीप्रमाणे यश आले नाही.

उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी गटनेते आनंद माने यांनी स्व. गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन शेकापशी हातमिळवणी करून उपनगराध्यक्ष पदाचे प्रशांत धनवजीर यांना निवडून आणले. गेल्या वर्षापासून गटनेते आनंद माने, भाजपचे चेतनसिंह केदार व शेकापचे चार नगरसेवक यांनी एकत्र येऊन विकास कामे करण्यास सुरुवात केली. सध्या नगराध्यक्षा राणी माने यांच्या १५ टक्के निधीतून शहरात विविध विकास कामांची उद्घाटने सुरू आहेत.

विकास कामांकडे दुर्लक्ष : साळुंखे-पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी शनिवारी संजय नगर, इंदिरा नगर झोपडपट्टी व परिसराला भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या मूलभूत गरजा, अडचणी जाणून घेतल्या. नगरपरिषद निवडणुकीत या भागाचे लोकप्रतिनिधी विकासाचे गाजर दाखवून निवडून आले. मात्र निवडणुकीनंतर त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगून त्यांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी या भागातील रस्ते, पाणी, वीज, गटारी अशा समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.

आडमुठेपणामुळे विकास खुंटला : आनंदा माने

आघाडीतील नगरसेवकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शहराचा गेली चार-साडेचार वर्षे विकास खुंटला आहे. नगरपालिकेत विकास कामात आडकाठी निर्माण करणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत. निवडणुकीच्या तोंडावर सांगोल्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजून बरेच काही पुलाखालून पाणी जाणार आहे, असे गटनेते आनंदा माने म्हणाले.

Web Title: From the development works, allegations and counter-allegations started circulating among the NCP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.