देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:31 IST2024-12-17T20:30:10+5:302024-12-17T20:31:24+5:30

भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

Devendra Fadnavis plan for new politics Who will be the guardian minister of Solapur | देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : महायुती सरकारचे खाते वाटप लवकरच होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा जयकुमार गोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्ता भरणे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. या विस्तारात येथील भाजप आमदारांना ठेंगा मिळाला. महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, अजितदादा गटाने राज्यात कुठे कोणत्या पक्षाचे पालकमंत्री असतील याची निश्चिती केली आहे. पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने पालकमंत्र्यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे. कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गेल्या ३० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंध आहे. शहर आणि ग्रामीण भागातील राजकीय गटांची त्यांना माहिती आहे. गेल्या दीड वर्षांत पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याचा कारभार हाताळला होता. त्यामुळे तेच पुन्हा पालकमंत्री होण्यासाठी भाजपचा एक गट प्रयत्नशील आहे.

गोरेंच्या निवडीमागचे राजकारण 

कॅबिनेटमंत्री जयकुमार गोरे शेजारच्या सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघाचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. माढ्याच्या निवडणुकीमुळे त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणाशी कनेक्ट आहे. माढा लोकसभा निवडणुकीत पराभवाची सल भाजप नेतृत्वाच्या मनात आहे. या पराभवाचे उट्टे काढण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. त्यातून भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते.

आमदारांना गटबाजीचे राजकारण नडले 

भाजप नेत्यांनी मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील आमदारांचा विचार केला नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली. या काळात मंत्र्यांमधील गटबाजी चर्चेत राहिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा गमाविल्या. भाजपच्या नेतृत्वाला केवळ आपल्या मतदारसंघात रमणारा आमदार नको आहे. सोलापूर जिल्ह्यात आपल्यासोबत किमान दोन-तीन आमदार निवडून आणणारा नेता हवा आहे. एकाला मंत्रिपद दिले; तर दुसरा आमदार नाराज होईल. त्यातून वाद वाढत राहतील, अशा काही मुख्य कारणांमुळे मंत्रिपद न मिळाल्याचे भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यााने 'लोकमत'ला सांगितले.
 

Web Title: Devendra Fadnavis plan for new politics Who will be the guardian minister of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.