देवेंद्रजी, मी तुमचं नाव घ्यायचं राहिलो, फडणवीसांवरुन मोदी-ठाकरेंची जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:01 PM2021-11-08T20:01:32+5:302021-11-08T20:02:11+5:30
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली.
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. त्यावेळी, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पंढरपूर पालखी मार्ग आणि पंढरपूरा जोडणाऱ्या रस्तेमार्गांच्या कामाची माहिती देताना वारकरी, वारी, माऊली, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर याबद्दल मोदी भरभरुन बोलले. याच कार्यक्रमात इतरही नेत्यांची भााषणे झाली. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात एक जुगलबंदी दिसून आली.
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली. अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवर आणि उपस्थित वारकरी संपद्राय असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायचं आपण विसरलो हे लक्षात येताच, उद्धव ठाकरे यांनी ती बाजू कव्हर केली. देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आमचे सहकारी देवेंद्रजी... असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी... असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, राज्यपाल, मु्ख्यमंत्री, केंद्रीयमंत्री यांची नावे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताना खास उल्लेख केला. माझे मित्र आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस... असे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस हे माझ्या किती जवळचे आहेत, हेच दाखवून दिलंय. कारण, इतरांची नावे घेताना मोदींनी केवळ पदाचा उल्लेख केला. पण, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताना मोदींनी मित्र असे संबोधत एकप्रकारे उद्धव ठाकरेंना चिमटाही काढला.
विठु-माऊलीच्या दर्शनाना डोळ्याचे पारणे फिटतात
वारकरी एकमेकांना माऊली नावानं हाक मारतात. माऊलीचा अर्थ आई म्हणजे मातृशक्तीचं हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक वीर दिले. पंढरपूरने मानवतेला केवळ भक्ती नव्हे तर देशभक्तीचा मार्गही दाखवला. विठ्ठलाचं दर्शन हे वारकऱ्यांसाठी ध्येय असतं. विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणे फिटतात. युगे युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपूरात उभा आहे. पालखी मार्गाचं भूमिपूजन करताना मला खूप आनंद होतोय असं त्यांनी सांगितले.