मंदिराचे नवे रूप पाहण्यासाठी भाविकांची पंढरपुरात तोबा गर्दी; रांगेत थांबलेल्या भाविकांना सात तासांनंतर देवाचे दर्शन
By काशिनाथ वाघमारे | Published: June 2, 2024 05:52 PM2024-06-02T17:52:38+5:302024-06-02T17:52:50+5:30
विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन म्हणजेच देवाच्या पायाला स्पर्श करणे. हे दर्शन रविवारपासून सुरू झाले. रांगेतील पहिल्या भाविकांला फुले देऊन मंदिर समितीने स्वागत केले.
काशिनाथ वाघमारे
सोलापूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बदललेले रूप पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत गर्दी केली. दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते आठ तासांचा वेळ लागला.
विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन म्हणजेच देवाच्या पायाला स्पर्श करणे. हे दर्शन रविवारपासून सुरू झाले. रांगेतील पहिल्या भाविकांला फुले देऊन मंदिर समितीने स्वागत केले. रविवारी पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत देवाची पहाटेची नित्यपूजा झाली. या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळीही उपस्थित होते.
७७ दिवसांनंतर पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे दर्शनाची रांग दोन नंबरच्या पत्रा शेडपर्यंत पोहोचली होती. दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना सात ते नऊ तासांनंतर विठ्ठलाचे दर्शन मिळूनदेखील भाविक आनंदी व समाधानी असल्याचे दिसून येत होते.