मनोहरमामाला भेटण्यास भक्त येऊ लागले, कोरोनाचे कारण सांगून पोलीस भेटू देईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:56+5:302021-09-22T04:25:56+5:30
उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यास पीडित महिलेवरील अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसांनी बारामती पोलिसांकडून रविवारी ताब्यात घेऊन अटक केली. ...
उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यास पीडित महिलेवरील अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसांनी बारामती पोलिसांकडून रविवारी ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी येथील न्यायालयासमोर उभे केल्यानंतर, मनोहरमामाला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मनोहरमामा भोसलेला कोठडी मिळाल्यानंतर, सोमवारी सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची शारीरिक तपासणी करण्यासाठी नेण्यात आले होते. मनोहरमामा भोसले ज्या जेलच्या खोलीमध्ये आहे, त्या खोलीत त्याच्यासमवेत इतर गुन्ह्यातील चार ते पाच आरोपी आहेत. तो कोणालाही काही बोलत नसल्याचे सांगण्यात आले.
सर्वसामान्य आरोपीस ज्या पद्धतीने चहा, नाश्ता व जेवण दिले जाते. त्याच पद्धतीचे जेवण मनोहरमामा भोसले याला दिले जात आहे. जेलमध्ये मनोहरमामाला भेटण्यास आलेल्या कोणाही स्नेही व भक्तास भेटण्याची परवानगी नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून गार्ड पोलीस काळजी घेत आहेत. मनोहरमामा असलेल्या जेलच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे.