संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह भाविक अर्धा तास ताटकळत उभेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:10 AM2020-07-01T11:10:32+5:302020-07-01T11:12:26+5:30
प्रशासनासोबतच्या वादानंतर महाद्वार घाटावरुन पादूका रवाना ; अखेर परंपरेनेच नगरप्रदक्षिणा केली पूर्ण
पंढरपूर : संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानानंतर परंपरेनुसार भक्त पुंडलिक दर्शनानंतर महाद्वार घाटावरुन बाहेर पडतात, मात्र महाद्वार घाट बंद केल्याने तुकाराम महाराजांच्या परंपरा पूर्ण करणे अडचण येत होती. परंतु वारकऱ्यांनी महाद्वार घाटावरुन जाण्याचा आग्रह धरला. अर्ध्या तासानंतर प्रशासनाच्या परवानगीने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह प्रदक्षिणा मार्गासाठी निघाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आलाय. मात्र काही नियम अटींसह मानाच्या ९ पालख्यांना परवानगी देण्यात आली होती. आषाढी एकादशी निमित्ताने मानाच्या संतांच्या पादूकांची नगरप्रदक्षिणा आणि पादुका स्नान पार पडले. प्रशासनाने पादूका स्नानासाठी उध्दव घाटावरून प्रवेश तर चंद्रभागा घाटावरुन बाहेर पडणार होते. इतर सर्व घाट प्रशासनाने बंद केले होते.
मात्र संत तुकाराम महाराजांच्या पादूका स्नानानंतर परंपरेने नुसार भक्त पुंडलिक दर्शनानंतर महाद्वार घाटावरुन बाहेर पडतात. मात्र महाद्वार घाट बंद केल्याने वारकऱ्यांनी महाद्वार घाटावरुन जाण्याचा आग्रह धरला. यावर पोलिस आणि पालखी संस्थानमध्ये वाद झाला. बराच वेळ पादूका चंद्रभागा वाळवंटात ताटकळत होत्या, अखेर प्रशासनाने नमते घेत चार वारकऱ्यांसह पादूका घेवून जाण्यास परवानगी दिली.