माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले; शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:45 PM2020-11-16T12:45:44+5:302020-11-16T12:46:13+5:30
सोमवारच्या मुहूर्तावर मंदिर उघडल्याने माचणूर परिसरात हर हर महादेवाचा जयघोष
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
कोरोनामुळे बंद असलेली धार्मिक स्थळे दीपावली पाडव्यापासून उघडण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र माचणूर( ता मंगळवेढा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान सिद्धेश्वराचे मंदिर मुख्य दरवाजा उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळे बंद ठेवली होती या धर्तीवर माचनूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. मंदिर बंद असल्याने परिसरात विविध धार्मिक साहित्य विक्री दुकाने, नारळ, फुल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती. भाविकांची संख्या पुर्णपणे रोडावली होती त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे सरपंच मनोज पुजारी, महाराष्ट्र राज्य गुरव क्रांती संघर्ष समीतीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष तुकाराम पुजारी, राज्य उपाध्यक्ष विकास पुजारी यांनी स्वागत केले भाविकांची शासनाने घालून दिलेल्या मास्क, हँडसानिटायझर, फिजिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे पुजारी सतीश चौगले यांनी केले आहे.
त्या पती पत्नीची तब्बल आठ महिने मंदिरात सेवा
ब्रह्मपुरी येथील मात्र मुंबई ठाणे येथे वास्तव्यास असणाऱ्या सतिश चौगुले याना लॉकडाऊनच्या आठ दिवस अगोदर पूजेसाठी आठवडा आला त्यामुळे ते ठाणे येथुन मार्च महिन्यात रिक्षाने माचनूर येथे आले त्यांनी आठवडा केला व लॉक डाऊन सुरू झाले त्यामुळे त्या पती पत्नीना मुंबई येथे जाता आले नाही त्यांनी आपला आठवडा संपल्याबरोबर इतरांचे आठवडे ही स्वतः करून मंदिरात सेवा केली. आता मंदिर सुरू झाले भाविकांची गजबज वाढल्याचे पाहून त्यांना अत्यानंद झाला इतके दिवस सेवाकार्य केल्याचे समाधान वाटत असल्याचे सतिश चौगुले यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.