मी खासदारकीचा विषय सोडून दिला होता, पण...; वाढदिवशी धैर्यशील मोहिते स्पष्टपणे बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 03:25 PM2024-04-13T15:25:57+5:302024-04-13T15:31:00+5:30
Madha Lok Sabha: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
Dhairyashil Mohite Patil ( Marathi News ) : भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. वाढदिवसानिमित्त आज धैर्यशील मोहिते यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तसंच लोकसभा निवडणूक लढवण्यामागचं कारणही सांगितलं आहे. "मी तिकिटासाठी मागणी केली होती. मात्र पक्षाने तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी हा विषय सोडून दिला होता. मात्र जनताच आम्हाला बसून देत नाही," असं म्हणत धैर्यशील मोहितेंनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळी माळशिरस तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यानंतर माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले की, " अनेक ठिकाणी घरं आणि गुरांच्या गोठ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या पावसात अनेक ठिकाणची वीज यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास पिण्याचा पाण्याचा आणि गुरांसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न तयार होईल. त्यामुळे ही दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मी घरी येऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या परिसरातील जनतेनं आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. अनेक लोकांची तिसरी पिढी आमच्यासोबत काम करत आहे. वाढदिवसाला माझा एकच संपल्प आहे की, आजोबांनी जे काम केलं, विजयदादांनी जे काम केलं ते करण्यासाठी तेवढी शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो, एवढीच प्रार्थना आहे."
शरद पवार उद्या मोहिते पाटलांच्या भेटीला
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. "उद्या सकाळी अकलूज इथं स्नेहभोजनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि इतर अनेक मोठे नेते येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारी सर्व लोकं येणार असून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचा राजकीय निर्णय जाहीर करू," अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली आहे.
राजीनामा देताना काय म्हणाले धैर्यशील मोहिते?
धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. "मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर बॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रिय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजीत करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा, ही विनंती," असं मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.