विरोधकांमध्ये धामधूम; राष्ट्रवादीत सामसूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:19+5:302021-03-13T04:40:19+5:30

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. आ. भालके यांचे पूत्र आणि ...

Dhamdhum among opponents; Nationalist Samsum! | विरोधकांमध्ये धामधूम; राष्ट्रवादीत सामसूम!

विरोधकांमध्ये धामधूम; राष्ट्रवादीत सामसूम!

Next

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. आ. भालके यांचे पूत्र आणि ‘विठ्ठल’चे अध्यक्ष भगीरथ भालके किंवा त्यांच्या मातोश्री जयश्री भालके यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. पक्षीय पातळीवरही त्यांच्याच घरातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह आहे. त्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीकडे पोटनिवडणुकीसाठी दुसरा प्रबळ उमेदवार नाही. भालके यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती लक्षात घेऊन भालके कुटुंबातच उमेदवार असेल हे मानले जात आहे. त्यानुसार त्यांचे पूत्र भगीरथ भालके यांनी मागील महिन्यात जनसंवाद यात्रेद्वारे गाव भेट दौरा काढला. त्यानंतर मागील आठवड्यात पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये पदाच्या निवडीवरून मोठी बंडाळी उडाली.

नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाला नारे, इशारे दिले. त्यांच्या जोडीला भगीरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळातही निर्णय प्रक्रिया सामावून घेत नसल्याचे कारण पुढे करत नाराजी निर्माण झाली आहे. विठ्ठलची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांना पहिली उचल देण्यास संचालक मंडळ असमर्थ ठरले आहे. कारखान्याने सुमारे १५ कोटी रुपयांची जीएसटी भरली नसल्याने सर्व खाती सील केली आहेत. त्यानंतर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई करत कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांच्याबाबत संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी पसरू लागली आहे.

दुसऱ्या बाजूला दामाजीचे अध्यक्ष समाधान अवताडे यांनी आपल्याला भाजपसह राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी, चाचपणीही सुरू आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मागील निवडणुकीपासून सुरू असलेली तयारी पुन्हा नव्या जोमाने सुरू केली आहे. अद्यापही पोटनिवडणुकीबाबत थांबा आणि पहाच्या भूमिकेत असलेल्या आ. परिचारक गटानेही बुधवारी पंढरपुरात पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने जाहीर मेळावा घेत पोटनिवडणूक लढवण्यासाठी तयारी असल्याचे घोषित करून खळबळ उडवून दिली आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने परिचारक कुटुंबातील कोणीही एक उमेदवार द्या, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. यावर आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक लढणार नसतील तर प्रणव परिचारक निवडणुकीत उतरतील, असे जाहीर करून टाकत निवडणुकीचे रणशिंग फुंगले आहे.

येणाऱ्या पोटनिवडणुकीत हक्काची जागा राखण्यासाठी भालके गट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर सर्वस्वी अवलंबून आहे. भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील दुफळी, विठ्ठलची बिकट आर्थिक अवस्था याचा फायदा घेऊन पोटनिवडणुकीसाठी विरोधकांमध्ये धाकधूक तर राष्ट्रवादीत सामसूम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ती जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे.

धनगर समाजाने बोलावली बैठक

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे. प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाने आ. भालकेंच्या झोळीत आपले दान भरभरून टाकले आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर येणाऱ्या निवडणुकीत समाजाची भूमिका ठरविण्यासाठी धनगर समाजाने समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. दत्ता डांगे यांच्या उपस्थितीत पंढरपुरातील होळकर वाड्यात बैठक बोलवली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Dhamdhum among opponents; Nationalist Samsum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.